पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने निवृत्त लष्करी जवानाने राज्यभरातील २६१ जणांची २६ कोटी ४१ लाख ४० हजारांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी लष्करी जवानासह सातजणांविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी निवृत्त लष्करी जवान सुरेश अण्णाप्पा गाडीवड्डार (रा. किंग्जवे सोसायटी, बी. टी. कवडे रस्ता, मूळ रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) याच्यासह सुभाष गाडीवड्डार, शुभांगी मोहीते, निकिता, सौरभ, गंगाधर, किरण दलाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रभात धरमपाल सिंग यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा : उद्धव ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयांचा फेरविचार करा; मुख्यमंत्र्यांकडे कोणी केली मागणी?
सुरेश गाडीवड्डार याने लष्करातील नोकरी सोडली. २०२० मध्ये त्याने एस. जी. ट्रेडर्स नावाने घोरपडीतील बी.टी.कवडे रस्ता परिसरात शेअर बाजार गुंतवणुकीबाबत व्यवसाय सुरू केला. त्यााने परिचितांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सांगितले. लष्करातील निवृत्त जवान असल्याने गुंतवणूकदारांनी विश्वास ठेवला. लष्करातील अनेक जवानांनी गुंतवणूक केली. गुंतवणुकीवर पाच ते दहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले. साडेतीन वर्ष त्याने परतावाही दिला.
हेही वाचा : गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी निखील पिंगळे
त्यानंतर एप्रिलपासून परतावा देणे बंद केले. गुंतवणूकदारांनी कार्यालायत जाऊन विचारणा केली. तेव्हा तांत्रिक अडचणीमुळे परतावा सध्या मिळत नाही, असे सांगितले. जुलै महिन्यात गाडीवड्डार कार्यालय बंद करून पसार झाला. आतापर्यंत त्याने २६१ जणांची फसवणूक केली असल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस निरीक्षक निळकंठ जगताप तपास करत आहेत.