पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत थेरगाव, डांगे चौक, आदित्य बिर्ला रुग्णालयाचा परिसर येतो. अत्यंत वर्दळीच्या डांगे चौकात सध्या कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. येथील वाकड फाट्याजवळील बीआरटी मार्गालगत कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकी समस्या काय?

डांगे चौक अत्यंत वर्दळीचा आहे. हिंजवडीतील माहिती व तंत्रज्ञान नगरी (आयटी पार्क) वाकडकडे जाण्यासाठी हा मार्ग असल्याने येथे सतत नागरिकांची वर्दळ असते. पीएमपीएमएलचाही मोठा थांबा आहे. वाकडफाट्याजवळील बीआरटी मार्गालगत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून, याचा नाहक त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडूनच याठिकाणी आजूबाजूचा कचरा गोळा करून ठेवला जातो. नंतर, तो घंटागाडी मार्फत मोशी कचरा डेपो येथे नेला जातो. मात्र, अनेकदा घंटा गाडी येत नसल्याने याठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले जातात. आठ ते दहा दिवस कचरा जागेवरच असतो, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. ओला, सुका कचरा साचल्याने परिसरात कमालीची दुर्गंधी पसरते, डासांचे प्रमाण देखील वाढल्याने आरोग्याचा सुद्धा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. याचा सर्वाधिक फटका येथील व्यापाऱ्यांना बसत आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. बीआरटी परिसर नेहमीच स्वच्छ राहील यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत.

हेही वाचा : पुण्यातील बड्या आयटी कंपनीकडून जल अन् ध्वनिप्रदूषण! स्थानिकांच्या तक्रारीनंतर अखेर दणका

बीआरटी मार्ग नागरिकांसाठी डोकेदुखी

डांगे चौकातील वाकड फाट्याजवळील बीआरटी मार्ग सध्या नागरिकांसाठी डोकेदुखी बनला आहे. कचऱ्याचे ढीग, पुलाखाली बेशिस्तपणे वाहने उभी करणे, वाहनांचा आडोसा मिळत असल्याने मद्यपी, जुगाऱ्यांचा अड्डा बनला आहे. भटक्या श्वानांचा वावर, स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. या सर्व गोष्टींचा पादचाऱ्यांसह येथील व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्याची नागरिकांची मागणी आहे.

बीआरटी मार्गात दिवसभर कचऱ्याचे ढीग साचलेले असतात. परिसराचे विद्रुपीकरण तर होतेच मात्र दुर्गंधीचा देखील सामना करावा लागतो. यामुळे ग्राहकांच्या संख्येवर देखील परिणाम होतो. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे तत्काळ लक्ष द्यावे. नियमितपणे कचरा उचलावा, असे डांगे चौकातील व्यावसायिक संजय महानवर म्हणाले.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस ठाण्यांमध्ये वाढ, आता ‘इतकी’ ठाणी; गुन्हेगारी नियंत्रणात येणार का?

नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकू नये. साचलेला कचरा तत्काळ उचलून साफसफाईच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच, कचरा साचणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले असल्याचे आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त अजिंक्य येळे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune garbage heaps at dange chowk one of the most busiest road in pune print news ggy 03 css