पुणे : बालमानसशास्त्राच्या अभ्यासिका, प्रामुख्याने मुलांसाठी लेखन करणाऱ्या लेखिका आणि पुण्यातील गरवारे बालभवनच्या संस्थापक-संचालिका शोभा भागवत (वय ७६) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. प्रसिद्ध चित्रकार आभा भागवत या त्यांच्या कन्या होत.
पालकत्व हे शास्त्र, कला आहे आणि सतत करण्याचा आनंदाचा अभ्यास आहे, हे शोभा भागवत यांनी आपल्या कामातून पटवून दिले. पुण्यातील गरवारे बालभवनच्या त्या संचालिका होत्या. मुलांसंबंधी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. पालकत्व या विषयावर त्यांचा विशेष अभ्यास होता. पुण्यामध्ये बालभवन ही संकल्पना राबविण्यामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान होते.
हेही वाचा : पुण्यात व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढलं म्हणून कर्मचाऱ्याची बॉसला बांबूनं मारहाण; आयफोन फोडला!
शोभा भागवत यांची पुस्तके
- आपली मुलं (मार्गदर्शनपर)
- गंमतजत्रा (बालसाहित्य)
- गारांचा पाऊस (मार्गदर्शनपर)
- बहुरूप गांधी (अनुवादित बालसाहित्य, मूळ इंग्रजी लेखक – अनु बंदोपाध्याय) . या पुस्तकाला जवाहरलाल नेहरूंची प्रस्तावना आहे.
- मूल नावाचं सुंदर कोडं (मुलांच्या बोलांचे संकलन)
- विश्व आपलं कुटुंब (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक – कृष्णकुमार). – मार्गदर्शनपर.
- सारं काही मुलांसाठी (मार्गदर्शनपर)