पुणे : आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी सामिष खवय्यांनी हजारो किलो मटण, मासळी, चिकनवर ताव मारून रविवारी ‘गटारी अमावस्या’ साजरी केली. मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी पुणे, मुंबई, ठाण्यातील बाजारात खवय्यांची गर्दी झाली होती.

आषाढ महिन्याची सांगता रविवारी (४ ऑगस्ट) झाली. श्रावण मासाची सुरुवात सोमवारी (५ ऑगस्ट) होणार आहे. श्रावण मासात सामिष पदार्थ वर्ज्य मानले जातात. अनेकजण नवरात्रोत्सवानंतर सामिष पदार्थांचे सेवन करतात. पुढील अडीच महिने सामिष पदार्थ वर्ज्य असल्याने खवय्यांची रविवारी चिकन, मटण, मासळीवर ताव मारला. मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी सकाळपासून दुकानांसमोर रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. अनेकांनी ‘आखाड पार्टी’साठी नातेवाईक, मित्रमंडळींना घरी आमंत्रित केले होते.

हेही वाचा : पुणे: चुकीच्या उपचारांमुळे दोन वर्षांपासून महिला अंथरुणाला खिळून; वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा

गणेश पेठेतील मासळी बाजारात सकाळपासून खरेदीसाठी गर्दी झाली होती. पापलेट, सुरमईसह ओले बोंबील, कोळंबी, हलवा या मासळींना चांगली मागणी होती. पापलेट, सुरमईचे दर तेजीत होते. मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळी, खाडीतील मासळी, आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन मासळी तसेच नदीतील मासळीची आवक झाली, अशी माहिती मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. हाॅटेल व्यावसायिकाकडून चिकनच्या मागणीत मोठी वाढ झाली, असे पुणे शहर बाॅयलर असोसिएशनचे संचालक रुपेश परदेशी यांनी सांगितले.

मटण, मासळी, चिकनचे किलोचे दर

मटण- ७४० रुपये

चिकन- २६० रुपये

पापलेट- १००० ते १५०० रुपये

सुरमई- ९०० ते १००० रुपये

कोळंबी- ३०० ते ५०० रुपये

ओले बोंबील- ३०० ते ४०० रुपये

हेही वाचा : साहित्य संमेलनाचे स्थळ ठरले! तब्बल सत्तर वर्षांनी मिळणार मान!

पावसामुळे सकाळी मटण खरेदीसाठी गर्दी झाली नाही. अनेकजण सहकुटुंब हाॅटेलमध्ये जाऊन गटारी साजरी करतात. हाॅटेल व्यावसायिकांकडून मटणाच्या मागणीत मोठी वाढ झाली.

प्रभाकर कांबळे, अध्यक्ष, पुणे शहर मटण दुकानदार असोसिएशन

पावसामुळे हिरमोड

रविवारी दिवसभर पाऊस सुरू असल्याने सकाळी बाजारात खरेदीसाठी कमी झाली. दुपारनंतर पाऊस कमी झाला. त्यानंतर बाजारात मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी गर्दी झाली. अनेकांनी गटारी साजरी करण्यासाठी पर्यटनस्थळांवर जाण्याचे बेत आखले होते. मात्र, पावसामुळे हिरमोड झाला.