पुणे : दिवे घाट पायथ्याशी असलेल्या वडकी गावच्या परिसरात स्फोट घडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ६७ जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. बाँम्ब शोधक नाशक पथकाने घटनास्थळावरुन जिलेटिनच्या कांड्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : धक्कादायक! पुण्यातील हाॅटेलच्या बाथरूममध्ये अल्पवयीन मुलांचे ड्रग्स सेवन, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
हडपसर -सासवड रस्त्यावरील वडकी गावातील गावदरा वस्तीत ६७ जिलेटिनच्या कांड्या (डिटोनेटर) सापडल्या. गावदरा वस्तीजवळ डोंगर असून, तेथे कांड्या सापडल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी बाॅम्ब शोधक नाशक पथकाला (बीडीडीएस) घटनास्थळी पाचारण केले. जिलेटिनच्या कांड्याची तपासणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या जिवास धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. जिलेटिनचा कांड्यांचा वापर खोदकामासाठी करण्यात येतो. खोल खड्डे, तसेच विहिरी खोदण्यासाठी कांड्याचा वापर करण्यात येतो.