पुणे : अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रसाधनगृहात तरुणीने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. तरुणीचा उपचारादरम्यान खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी महाविद्यालयातील तरुणीसह, कॅन्टीनमधील एकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
रेणुका बालाजी साळुंके (वय १९) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत तिचे वडील बालाजी धोडिंबा साळुंके (वय ४९, रा. जेवळी, ता. लोहारा, जि. धाराशिव) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महाविद्यालयीन तरुणी मुस्कान महेंद्रसिंग सिद्धू , तसेच कॅन्टीनमधील कर्मचारी सतीश जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा…पुणे विद्यापीठात ११ प्राध्यापकांकडे ४० पदांचा अतिरिक्त कार्यभार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणुका भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅन्टीनमधील कर्मचारी जाधव तिला त्रास देत होता. त्याने रेणुकाच्या मोबाइलवर संदेश पाठविले होते. तू एवढी व्यस्त आहे का ? मी तुझ्यावर प्रेम करतो, असे संदेश पाठवून तिला त्रास दिला होता. रेणुका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होती. तिच्याबरोबर राहणारी मुस्कान सिद्धू तिला अभ्यास करू द्यायची नाही, तसेच रात्री खोलीतील दिवे बंद करण्यास सांगायची. मुस्कानने तिला त्रास दिला होता. त्रासामुळे रेणुकाने वसतिगृहातील प्रसाधनगृहात ७ मार्च रोजी पेटवून घेतले. गंभीर भाजलेल्या रेणुकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा…सनदी लेखापाल परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर
या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, सहायक निरीक्षक वर्षा तावडे यांनी घटनास्थळी भेट दिली. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रेणुकाने पोलिसांना मृत्यूपूर्व जबाब दिला होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. वडिलांनी दिलेली फिर्याद आणि मृत्यूपूर्व जबाबावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहायक निरीक्षक वर्षा तावडे तपास करत आहेत.