पुणे : कर्वेनगर भागातील बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी दोन लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगर भागातील वेदांतनगरी परिसरात तक्रारदार महिलेच्या वडिलांचा बंगला आहे. बंगल्यात महिलेचे वडील आणि काका कुटुंबीयांसह राहायला आहेत. दुमजली बंगल्यात मध्यरात्री शिरलेल्या चोरट्यांनी खिडकीच्या काचा सरकवून आत प्रवेश केला. चोरट्यांनी शयनगृहातील कपाटातून दोन लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच वारजे पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे तपास करत आहेत.

नगर रस्त्यावरील कोलवडी गावात एका घरातून चोरट्यांनी ९० हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. कोलवडी गावात तक्रारदारांचे घर आहे. ते शेतकरी आहेत. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडले. कपाटातील दागिने आणि रोकड असा ९० हजारांचा ऐवज चोरुन चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गाेडसे तपास करत आहेत.

हेही वाचा : ‘महारेरा’चा दणका! पुण्यातील ४८७ गृहप्रकल्पांना स्थगिती

किराणा माल दुकानातून परदेशी चलन चोरीला

कोंढव्यातील किराणा माल विक्री दुकानात ठेवलेले परदेशी चलन चोरून नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत किराणा माल विक्रेत्याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराचे कोंढव्यात राॅयल बालाजी ट्रेडर्स किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचा लोखंडी दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यातील २०० सौदी रिआल आणि २०० अमेरिकन डाॅलर चोरुन चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर तपास करत आहेत.

Story img Loader