पुणे : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सातत्याने वाढ सुरू आहे. भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्राहकांनी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खरेदीसाठी हात आखडता घेतल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धनत्रयोदशीच्या व्यवसायात ५ टक्के घट होण्याची शक्यता ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने व्यक्त केली आहे.
धनत्रयोदशी हा सोन्याच्या खरेदीसाठी शुभ मुहूर्त मानला जातो. या मुहूर्तावर नागरिकांकडून सोन्याची खरेदी केली जाते. यंदा दुपारपर्यंत सराफी फेढ्यांमध्ये ग्राहकांची फारशी गर्दी दिसून आली नाही. सायंकाळनंतर ग्राहकांची गर्दी पेढ्यांमध्ये दिसून आली. यंदा धनत्रयोदशीला गेल्या वर्षीएवढीच २० टन सोन्याची विक्री अपेक्षित आहे. मात्र, जास्त भावामुळे सोन्याच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो, अशी माहिती ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे अध्यक्ष सैयाम मेहरा यांनी दिली.
हेही वाचा : बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ… कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
सोन्याचा भाव मुंबईत आज प्रति १० ग्रॅमला ७८ हजार ७४५ रुपयांवर गेला. याचवेळी चांदीचा भाव प्रतिकिलो ९७ हजार ८७३ रुपयांवर गेला. याचवेळी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ८१ हजार ५०० रुपयांवर होता. दिल्लीत चांदीच्या भाव प्रतिकिलो ९९ हजार ५०० रुपये होता.
याबाबत सेन्को गोल्ड अँड डायमंड्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सौवांकर सेन म्हणाले की, धनत्रयोदशीला भाव जास्त असल्याने विक्रीत १२ ते १५ टक्के घट होईल. मात्र, भाव जास्त असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण व्यवसायात १० ते १२ टक्के वाढ होईल. ग्राहकांकडून कमी वजनाच्या दागिन्यांना मागणी जास्त आहे. विशेषत: नोकरदार महिलांकडून ही मागणी वाढत आहे.
हेही वाचा : कल्याणीनगरमधील ‘बॉलर’ पबच्या मालकाविरुद्ध गुन्हा; कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत
यंदा धनत्रयोदशीला सराफी पेढ्यांमध्ये सकाळपासून ग्राहकांची गर्दी नव्हती. कारण मुहूर्त सायंकाळपासूनचा आहे. त्यामुळे आज उशिरा आणि उद्याही सकाळी गर्दी दिसून येईल. आगामी सणासुदीच्या काळाचा विचार करून ग्राहकांकडून दागिने खरेदी केली जात आहे. नेकलेस सेट, बांगड्या, ब्रेसलेट आणि चांदीच्या वस्तूंना मागणी अधिक आहे. – सौरभ गाडगीळ, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स