पुणे : त्वचेच्या स्वयंप्रतिकार आजारांवरील उपचारासाठी मदत करणाऱ्या ऑटो-इम्यून ब्लिस्टरिंग डिसीज फाऊंडेशनच्या (एआयबीडीएफ) वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे आणि डाॅ. मंदाकिनी आमटे यांना गोंदण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
डेक्कन क्लब हाऊस येथे बुधवारी (२ एप्रिल) सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या हस्ते आमटे दाम्पत्याला गोंदण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रवीण जोशी हे आमटे दाम्पत्याची प्रकट मुलाखत घेणार आहेत, अशी माहिती ‘एआयबीडीएफ’चे संस्थापक अशोककुमार सुरतवाला यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. शरद मुतालिक, अनिरुद्ध बंबावाले, जयंत हेमाडे या वेळी उपस्थित होते.
डॉ. शरद मुतालिक म्हणाले, ‘त्वचेच्या आजारांकडे समाज आजही तुच्छतेने पाहतो. त्यामुळे अशा रुग्णांना आजारासोबत अन्य अडचणींचा सामना करावा लागतो. आर्थिक आणि सामाजिक संघर्षाला सामोरे जावे लागते. अशावेळी त्वचेच्या आजारांबाबत जागृती करून ऑटो-इम्यून ब्लिस्टरिंग आजारांनी ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी सुरू केलेला सामाजिक उपक्रम आहे. अशोककुमार सुरतवाला यांच्या प्रेरणेने दिवंगत जयश्री सुरतवाला यांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या फाउंडेशनमार्फत लोकांमध्ये ऑटो-इम्यून ब्लिस्टरिंग आजारांविषयी जागरूकता वाढवण्यासह लवकर निदान व योग्य उपचारांसाठी मार्गदर्शन, गरजू रुग्णांना मदत देण्यात येते. तसेच या आजारांतून बऱ्या झालेल्या रुग्णांचे अनुभव पीडितांपर्यंत पोहचवून त्यांना प्रगत उपचार घेण्यास प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. आधुनिक औषधोपचार सर्वांसाठी सुलभ आणि परवडणारे करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे.’
अधिक माहिती आणि उपचारांसाठी अर्थसहाय्य हवे असलेल्या रुग्णांनी ९११२००६८८४४ तसेच ९३४१८००२०० या क्रमांकावर किंवा info@aibdf.in या ईमेलवर संपर्क साधावा. https://aibdf.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन अनिरुद्ध बंबावाले यांनी केले आहे.