पुणे : बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडाला गुन्हे शाखेच्या पथकाने गुलटेकडी परिसरात पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहे. सज्जन सुनील जाधव (वय १९, रा. डांगे चौक, पिंपरी, मूळ रा. रेणुशीमोरा, महाबळेश्वर, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. जाधव सराइत असून, त्याच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पथक गस्त घालत होते. गुलटेकडीतील डायस प्लाॅट परिसरात जाधव थांबला होता. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस हवालदार उज्वल मोकाशी आणि शंकर कुंभार यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि काडतूस सापडले.

हेही वाचा : राज्याचे स्वतंत्र शैक्षणिक अस्तित्व संपवायचे आहे का? पहिलीपासून हिंदी, वेळापत्रक बदलावर शिक्षण क्षेत्रातून टीका

पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, आशिष कवठेकर, उपनिरीक्षक नितीन कांबळे, शंकर नेवसे, निखिल जाधव, अमोल सरडे, साधना ताम्हाणे, पुष्पेंद्र चव्हाण, ओम कुंभार यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा : पुण्यात आता हेल्मेटसक्ती ! सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

शहरातील सराइत मध्य प्रदेशातून पिस्तूल आणतात. देशी बनावटीची पिस्तूल विक्री करणाऱ्या सराइतांना यापूर्वी पकडण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा नाना पेठेत १ सप्टेंबर रोजी पिस्तुलातून गोळीबार करुन खून करण्यात आला होता. याप्रकरणातील आरोपींनी आंदेकर यांचा खून करण्यापूर्वी मध्य प्रदेशातून पिस्तूले खरेदी केली होती. आंदेकर खून प्रकरणातील आरोपींकडून पोलिसांनी सात पिस्तुले, काडतुसे, कोयते जप्त केले होते.