पुणे : गुंड शरद मोहोळ याच्या खुनाचा बदला घेण्याचा डाव पोलिसांनी शुक्रवारी उधळून लावला. मोहोळ टोळीतील दोघांकडून पोलिसांनी पिस्तूले आणि सात काडतुसे जप्त केली. आरोपींनी पिस्तुले मध्यप्रदेशमधून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शरद शिवाजी मालपोटे (वय २९), संदेश लहू कडू (वय २४, दोघे रा. कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तुले जप्त करण्यात आली. शरद मोहाेळ याचा गेल्या वर्षी ५ जानेवारी रोजी कोथरुडमधील सुतारदरा परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. मोहोळ याचा खून वर्चस्व, तसेच वैमनस्यातून झाल्याचे तपासात उघडकीस आले होते. या प्रकरणात गुन्हे शाखेने गुंड विठ्ठल शेलार, गणेश मारणे, मुन्ना पोळेकर यांच्यासह दहा जणांना अटक केली होती. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पुणे : ‘राजगुरुनगर’ अत्याचार प्रकरणात कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाखांची नुकसान भरपाई

मोहोळचे साथीदार खूनाचा बदला घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सापळा लावून मालपोटे आणि कडू यांना खराडी भागात पकडले. त्यांच्याकडून दोन पिस्तूले आणि काडतुसे जप्त करण्यात आली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, आशिष कवठेकर, नितीन कांबळे, अमोल सरडे, ओंकार कुंभार, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, विजय पवार यांनी ही कारवाई केली. आरोपींनी पिस्तूले मध्य प्रदेशातून आणली असून, त्यांना पिस्तूल खरेदीसाठी पैसे कोणी दिले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune goon sharad mohol murder revenge attempt failed pistols cartridges seized from mohol gang pune print news rbk 25 css