पुणे : सिंहगड पायथा परिसरात फिरायला गेलेले शासकीय ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण केल्यानंतर तासाभरात त्यांचा आरोपींनी खून केला. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन आरोपींनी खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात टाकून दिल्याचे उघडकीस आले आहे. पोळेकर खून प्रकरणाता आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिंहगड पायथ्याजवळील डोणजे गावात विठ्ठल सखाराम पोळेकर (वय ७०) राहायला हाेते. गुरुवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे सिंहगड पायथा परिसरात फिरायाल गेले होते. ते घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोळेकर याचे अपहरण करुन खून करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी शुभम पोपट सोनवणे (वय २४, रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), मिलिंद देविदास थोरात (वय २४, रा. बेळगाव, कर्जत, जि. अहिल्यानगर), रोहित किसान भामे (वय २२, रा. डोणजे, ता. हवेली) यांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी योगेश उर्फ बाबू किसन भामे (वय २४, रा. डोणजे, ता. हवेली) पसार झाला आहे. आरोपी रोहित हा त्याचा भाऊ आहे. आरोपी शुभम आणि मिलिंद हे सिंहगड पायथा परिसरातील एका हॉटेलमध्ये कामाला आहेत. त्यांना पैशांचे आमिष दाखवून योगेश भामेने पोळेकर यांचा खून घडवून आणल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. अतिरिक्त अधीक्षक रमेश चाेपडे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा:भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..

पोळेकर बेपत्ता झाल्यानंतर हवेली आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. पोळेकर यांच्या घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासण्यात आले. चित्रीकरणात त्यांना एक मोटार दिसून आली. तांत्रिक तपासात मोटार सिंहगड किल्ल्याच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. मोटारमालकाचा शोध घेण्यात आाल. तेव्हा मोटार आरोपी योगेश भामे वापरत असल्याचे उघडकीस आले.

त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोळेकर बेपत्ता झाल्यापासून आरोपी भामे, त्याचे साथीदार शुभम आणि मिलिंद गावातून बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. तांत्रिक तपासात शुभम आणि मिलिंद जबलपूरला पसार झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी जबलपूर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले. जबलपूर लोहमार्ग पोलिसांनी शुभम आणि मिलिंद यांना ताब्यात घेतले. चौकशीत अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला, तसेच मुख्य आरोपी भामे असल्याची माहिती त्यांनी दिली. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मृतदेहाचे तुकडे टाकण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी या भागात शोधमोहीम राबविली. पाण्यात अवयव सापडले. शीर धडावेगळे करण्यात आल्याचे उघडकीस आले. पाणलोटात सापडलेले धड पोळेकर यांचे आहे किंवा कसे हे तपासण्यासाठी ते डीएनए चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे, असे पोलीस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा:‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा

पोळेकर यांची दिनचर्या आरोपी योगेश भामेला माहिती होती. ते सकाळी फिरायला निघाले. तेव्हा मामा एक काम आहे, असे सांगून भामेने त्यांचे मोटारीतून अपहरण केले. डोणजे परिसरातील पाणलोटात पोळेकर यांना नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर शस्त्राने वार करुन निर्घृण खून करण्यात आला. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. मृतदेहाचे तुकडे पाण्यात टाकून देण्यात आले. आरोपी भामे परराज्यात पसार झाल्याची शक्यता असून, त्याचा शोध घेण्यात येणात असल्याचे त्यांनी सांगितले.

पोळेकरांचा खून कशामुळे ?

शासकीय ठेकेदार पोळेकर यांनी पायगुडेवाडी ते गोळेवाडी रस्त्याच्या कामाचा ठेका घेतला होता. या कामात अडथळा आणण्याची धमकी देऊन मुख्य आरोपी योगेश भामेने त्यांच्याकडे महागडी मोटार, तसेच दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास पोळेकर आणि त्यांचा मुलगा प्रशांत यांचा खून करण्याची धमकी त्याने दिली होती त्यांचा खुनामागचे नेमके कारण काय आहे, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोळेकर यांच्या खूनामागे कौटुंबिक वाद आहेत का? , यादृष्टीने तपास सुरू आहे. याप्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून, चौकशीत खूनामागचे निश्चित कारण समजू शकेल, असे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा:आमदाराच्या नावाने कंपनी मालकाकडे पैशांची मागणी

दोन महिन्यांपूर्वी धमकी

मुख्य आरोपी भामे याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, शस्त्रे बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने पोळेकर यांना दोन महिन्यापूर्वी धमकावले होते. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर गैरसमजातून तक्रार दिल्याचे सांगून पोळेकर यांनी तक्रार मागे घेतली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune government contractor vitthal polekar murder within few hours after kidnapped pune print news rbk 25 css