पुणे : हे तसे ‘चर्चिले’ शहर म्हणून ओळखले जाते. काही लोक यावरून पुण्याला नावे ठेवतात. पण, चर्चा करणे यात वाद-संवाद दोन्ही अभिप्रेत असते आणि कोणत्याही लोकशाहीत ते आवश्यक असते. पुण्यात तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींपासून महापालिकेच्या वॉर्डस्तरीय निर्णयापर्यंत सगळ्याची चर्चा होऊ शकते. आणि चर्चाही साधीसुधी होत नाही. चर्चेत त्या विषयाच्या अक्षरश: सर्व साली सोलून अर्कापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतो. हे गरजेचे, की बिनगरजेचे हा प्रश्न नाहीच. चर्चेमुळे त्या विषयाचे सर्व पैलू समोर येत असल्याने ती व्हायलाच हवी. प्रश्न, किती ताणायचे हा. पुण्यात सध्या जी हेल्मेटसक्तीवरून चर्चा सुरू आहे, त्याला हा प्रश्न लागू पडतो. दुचाकी चालविणाऱ्यांनी हेल्मेट वापरणे बंधनकारक असावे, की नसावे, याची चर्चा पुणे गेल्या किमान २३ वर्षांपासून करते आहे. सन २००१ मध्ये पुण्यातील सिम्बायोसिस शिक्षण संस्थेच्या कायद्याच्या विद्यार्थ्याने दुचाकीचालकांना हेल्मेटसक्ती करावी, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. या प्रकरणात एकूण आठ याचिकाकर्ते होते. त्यातील एका याचिकाकर्तीने विधी महाविद्यालय रस्त्यावरील अपघाताचा दाखला दिला होता, ज्यात एका दुचाकीचालक तरुणाला हेल्मेट नसल्याने डोक्याला गंभीर इजा झाली होती. हेल्मेट असते, तर ही इजा टाळता किंवा किमान कमी करता आली असती, असे त्यात म्हणणे होते. या संपूर्ण प्रकरणाचे पुढचे तपशील पुन्हा उगाळण्याचे कारण नाही. मुद्दा हा, की तेव्हापासून हेल्मेटसक्तीची चर्चा पुणेकर करतच आहेत. आता नियम सांगतो, की दुचाकी चालविणाऱ्याने आणि त्याच्या मागे बसलेल्या सहप्रवाशाने हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. मग तरी चर्चा का? तशी कारणे अनेक आहेत. पण, त्यातील समान धागा हा, की हेल्मेट वापरलेच पाहिजे, ही सक्ती कशासाठी? ते वापरावे, की न वापरावे, याचा निर्णय दुचाकी चालविणाऱ्यावर सोडून द्यावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा