पुणे : मुळशीत जमीन बळका‌वण्यासाठी एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याचा जामीन अर्ज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांनी फेटाळून लावला. मुळशीतील दारवली गावातील शेतकरी प्रदीप शिवाजी बलकवडे (वय ३५) यांची जमीन बळकावण्यासाठी हिंदू राष्ट्र सेनेचा धनंजय देसाई आणि साथीदारांनी १ ऑगस्ट रोजी बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. याबाबत बलकवडे यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. देसाई याने जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. सरकारी वकील ॲड. विलास घोगरे पाटील, बलकवडे यांचे वकील ॲड. अमेय बलकवडे, ॲड. सतीश कांबळे, ॲड. सूरज शिंदे, ॲड. ऋषीकेश कडू यांनी देसाई याच्या जामीन अर्जास विरोध केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : सनसिटी-कर्वेनगर उड्डाणपुलाचे काम रखडले! सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कायम

देसाईविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात १७ गुन्हे दाखल आहेत. जातीय तेढ निर्माण करणे, खून, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल झाले आहेत. जमीन बळकावण्यासाठी देसाई आणि साथीदारांनी बलकवडे यांना बेदम मारहाण केली होती. या गुन्ह्यात त्याच्या फरार साथीदारांचा शोध घ्यायचा आहे. बलकवडे यांना धमकावण्यासाठी पिस्तुलाचा वापर करण्यात आला होता. देसाईने वापरलेले पिस्तूल जप्त करायचे आहे. त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशी विनंती सरकारी वकील ॲड. घोगरे-पाटील आणि फिर्यादी बलकवडे यांच्या वकिलांनी युक्तीवादात न्यायालयाकडे केली. न्यायालयाने देसाई याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.