कोणत्याही उद्योगाची प्रमुख गरज अखंडित वीजपुरवठा ही असते. उद्योगांची नेमकी हीच गरज सध्या पूर्ण होताना दिसत नाही. विशेष म्हणजे, देशात औद्योगिक विजेचा सर्वाधिक दर महाराष्ट्रात आहे. त्यामुळे महागडी वीज घेऊनही पुणे जिल्ह्यातील उद्योजक हवालदिल झाल्याचे चित्र आहे.
उद्योगांना पूरक वातावरण निर्माण करण्याच्या घोषणा सरकारी पातळीवरून सातत्याने सुरू असतात. त्या प्रत्यक्षात किती उतरतात, याचा अनुभव सध्या पुणे जिल्ह्यात येत आहे. एखाद्या भागात गुंतवणूक करताना उद्योग, जमीन आणि पाण्यासोबत अखंडित वीजपुरवठ्याची हमी सरकारकडे मागतात. पुण्यात उद्योगांना जमीन आणि पाणी मिळत आहे; मात्र, अखंडित वीजपुरवठा देण्यात यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत. हीच परिस्थिती राहणार असेल, तर सरकार कोणत्या बळावर उद्योगांना गुंतवणूक करण्यास सांगते, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
दर वर्षी उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्यानंतर वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढतात. आताही तोच प्रकार पुण्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये सुरू आहे. याला अगदी हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कही अपवाद नाही. वीजपुरवठा खंडित झाल्याने उद्योग त्रस्त झाले आहेत. चाकण औद्योगिक वसाहतीत मागील काही काळापासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. उन्हाळ्यात हे प्रमाण वाढल्याने उद्योगांना मोठा फटका बसत आहे. अनेक कंपन्यांना काम बंद ठेवावे लागत असून, त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
याबाबत फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल म्हणाले, की वीजपुरवठा खंडित करण्याची कोणतीही पूर्वसूचना कंपन्यांना दिली जात नाही. देखभालीचे काम सुरू असेल, तरी महावितरणकडून आधी कळविले जात नाही. यामुळे कंपन्यांचे काम अचानक बंद पडते. उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण आणखी वाढले आहे. यामुळे काम बंद राहून उत्पादन ठप्प झाले आहे. वीज पुरवठ्याचा दाब कमी-जास्त झाल्याने महागडी यंत्रसामग्री खराब होत आहे. काम बंद असतानाही कामगारांना वेतन देण्याची वेळ आली आहे. याचा आर्थिक फटका कंपन्यांना बसत आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरातील लघुउद्योजकही वीज पुरवठ्याच्या समस्यांमुळे त्रस्त झाले आहेत. याबाबत पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले, की महावितरणकडून वीजपुरवठा खंडित होत असल्याने लघुउद्योगांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या मार्चअखेर असून, कार्यादेश पूर्ण करण्याची उद्योगांची धावपळ सुरू आहे. दिवसांतून अनेकदा वीजपुरवठा खंडित होत आहे. एखाद्या महिन्याचे देयक न भरल्यास तातडीने वीजपुरवठा तोडला जातो. आता वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे उद्योगांच्या होणारी नकुसानीची भरपाई महावितरणने द्यायला हवी.
अशीही काही कारणे…
वीज पुरवठा खंडित होण्यामागे केवळ वीज यंत्रणा कारणीभूत नसून, इतरही घटकांचा समावेश आहे. हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील वीजपुरवठा गेल्या १० ते १५ दिवसांत ३ वेळा खंडित झाला. यामागे आंबेगाव तालुक्यातील डोंगराळ भागातील गवत पेटविण्याच्या घटना कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. या भागात ग्रामस्थ गवताला आग लावतात. तिथे नजीक वीजवाहिनी असल्यास ती बंद पडते. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. परिणामी महापारेषणच्या कर्मचाऱ्यांवर या भागात गस्त घालण्याची वेळ आली आहे.
sanjay.jadhav@expressindia.com