पुणे : प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील बारावीपर्यंतच्या शाळांना आज (९ जुलै) सुटी जाहीर केली होती. त्यानुसार आज शाळांना सुटी असल्याने विद्यार्थी दिवसभर घरीच राहिले, पण शहर आणि परिसरात दिवसभर पाऊस पडलाच नाही. त्यामुळे सुटी वाया गेल्याची चर्चा समाजमाध्यमांत झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये, तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जिल्ह्यातील बारावीपर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुटी जाहीर केली. मात्र या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करण्याबाबतही आदेशात स्पष्ट करण्यात आले होते.

हेही वाचा : रिंगरोडबाबत मुख्यमंत्री शिंदे यांची विधिमंडळात महत्त्वाची माहिती

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार महापालिकेच्या शिक्षण विभागाकडूनही शाळांच्या सुटीचे आदेश देण्यात आले. त्यानंतर शाळांकडूनही पालकांना सुटी असल्याचे कळवण्यात आले. मात्र हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार शहर, परिसरात अतिवृष्टी किंवा मुसळधार पाऊस पडला नाही. दिवसभर ऊन आणि स्वच्छ वातावरण होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना दिलेली सुटी वाया गेल्याची चर्चा समाजमाध्यमांत सुरू होती. गेल्यावर्षीही सुरक्षिततेचा उपाय म्हणून शाळांना सुटी दिलेल्या दिवशी पाऊस पडला नव्हता, अशी आठवण करून देण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune holiday given for school students after warning of heavy rain but no rain on the 9th july pune print news ccp 14 css