पुणे : पुण्यातील घरांच्या विक्रीला घरघर लागल्याचे चित्र आहे. घरांच्या विक्रीत जुलैपासून सलग तिसऱ्या महिन्यात सप्टेंबरमध्ये घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सप्टेंबर महिन्यात घरांच्या विक्रीत तब्बल ३३ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागांत यंदा सप्टेंबर महिन्यात ११ हजार ५६ घरांची विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात १६ हजार ६०४ घरांची विक्री झाली होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सरकारला घरांच्या विक्रीतून ५८५ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले होते. यंदा सप्टेंबरमध्ये त्यात घट होऊन हे मुद्रांक शुल्क ५०८ कोटी रुपयांवर आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सप्टेंबर महिन्यात घरांच्या विक्रीत ३३ टक्के आणि मुद्रांक शुल्क संकलनात १३ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.

पुण्यात यंदा जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत १ लाख ३८ हजार ४१२ घरांची विक्री झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत घरांची विक्री १ लाख ७ हजार २७ होती. या वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांचा विचार करता घरांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ३० टक्के वाढ झाली आहे. मात्र, या वर्षात जुलैपासून घरांच्या विक्रीत घसरण होत असल्याचे दिसत आहे. पुण्यात जूनमध्ये घरांची विक्री १४ हजार ९६० होती. त्यात घट होऊन जुलैमध्ये १३ हजार ७३१, ऑगस्टमध्ये १३ हजार ३९७ आणि सप्टेंबरमध्ये ११ हजार ५६ अशी घरांची विक्री झाल्याचे अनारॉक ग्रुपच्या अहवालातून समोर आले आहे.

हेही वाचा : पुणे : कटक मंडळाच्या रुग्णालयातील गच्चीवर मृतदेह सापडला

पितृ पक्षाचा फटका

सर्वसाधारणपणे पितृ पक्षाचा कालावधी अशुभ मानला जातो. या कालावधीत घरांसह वाहनांची खरेदी नागरिक करीत नाहीत. यंदा पितृ पक्ष १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत होता. गेल्या वर्षीचा विचार करता पितृ पक्ष २९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत होता. त्यामुळे यंदा अर्धा सप्टेंबर महिना पितृ पक्षात गेल्याने घरांच्या विक्रीत घट झालेली दिसून येत आहे, असे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

पुण्यातील घरांची विक्री

किंमत (रुपयांत) – विक्रीतील वाटा (टक्क्यांत)

२५ लाखांपेक्षा कमी – २१

२५ ते ५० लाख – ३४

५० लाख ते १ कोटी – ३०

हेही वाचा : पिंपरी विधानसभा: अजित पवारांचे विश्वासू आमदार अण्णा बनसोडेंना महायुतीमधून विरोध; १८ माजी नगरसेवकांचा ठराव

१ कोटी ते २.५ कोटी – १३

२.५ ते ५ कोटी – २

५ कोटींपेक्षा अधिक – १ पेक्षा कमी