पुणे : शहरातील वेगवेगळ्या भागात घरफोडीत चोरट्यांनी साडेआठ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली. सिंहगड रस्ता, तसेच बालेवाडी परिसरात या घटना घडल्या. याप्रकरणी पर्वती आणि बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सिंहगड रस्त्यावर एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील तीन लाख ६० हजारांचे सोन्याचे दागिने आणि मोबाइल संच चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला सिंहगड रस्ता भागातील पंचतारा सोसायटीत राहायला आहेत. बुधवारी (१ जानेवारी) त्या सदनिका बंद करुन बाहेर गेल्या होत्या. सायंकाळी सातच्या सुमारास त्या घरी परतल्या. तेव्हा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील तीन लाख ६० हजारांचे साेन्याचे दागिने आणि मोबाइल संच असा ऐवज चोरुन नेल्याचे उघडकीस आले. घरफोडी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.
हे ही वाचा… पुणे महापालिका निवडणुकीदरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला राहावा : नाना भानगिरे
हे ही वाचा… गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या डिसेंबरमध्ये तापमानवाढ; उत्तर-दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम
बालेवाडी परिसरात एका बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार लाख ९८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाचा बालेवाडीतील इरा बेकरीच्यामागे बंगला आहे. मंगळवारी (३१ डिसेंबर) ते बाहेर गेले होते. चोरट्यांनी बंगल्याचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी दागिने चोरुन नेले. घरफोडीची घटना उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके तपास करत आहेत.