पुणे : पुण्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या असलेल्या परिसरात घरभाड्यात सर्वाधिक वाढ होत आहे. हिंजवडी आणि वाघोलीत घरभाडे सर्वाधिक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या तिमाहीत हिंजवडीत ४ टक्के आणि वाघोलीत ७ टक्के घरभाडे वाढले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनारॉक ग्रुपने देशातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. यात देशातील प्रमुख सात महानगरांचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार, पुण्यात हिंजवडी आणि वाघोलीत घरभाड्यात सर्वाधिक वाढ झाली आहे. हिंजवडीत २ बीएचके (१ हजार चौरस फूट) सदनिकेचे भाडे २०२२ च्या अखेरीस २१ हजार रुपये होते. ते २०२३ च्या अखेरीस २५ हजार ६०० रुपये आणि यंदा मार्चअखेरीस २६ हजार ५०० रुपयांवर पोहोचले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या तिमाहीत घरभाडे ४ टक्क्यांनी वाढले आहे. वाघोलीत घरभाडे २०२२ च्या अखेरीस १७ हजार होते. ते २०२३ च्या अखेरीस २० हजार ६०० आणि यंदा मार्चअखेरीस २२ हजार रुपयांवर पोहोचले. गेल्या वर्षीच्या तुलनेत पहिल्या तिमाहीत घरभाडे ७ टक्क्यांनी वाढले आहे.

हेही वाचा : बासमती तांदळाची विक्रमी निर्यात; जाणून घ्या कोणत्या देशांना झाली निर्यात

देशातील सात महानगरांचा विचार करता यंदा पहिल्या तिमाहीत सरासरी घरभाड्यात ४ ते ९ टक्के वाढ झाली आहे. घरभाड्यात वार्षिक ५ ते १० टक्के वाढ मोठी मानली जाते. साहजिकच त्याचा फायदा घरमालकांना होत असला तरी भाडेकरूंना त्याची आर्थिक झळ बसत आहे. देशात सर्वाधिक भाडेवाढ बंगळुरूत झाली आहे. बंगळुरूमध्ये पहिल्या तिमाहीत सर्जापूर रस्ता आणि व्हाईटफिल्ड रोज या भागात घरभाडे ८ टक्क्यांनी वाढले आहे. पहिल्या तिमाहीतील घरभाड्यातील वाढ दिल्लीत गोल्फ कोर्स ४ टक्के आणि नोएडा सेक्टर १५० मध्ये ९ टक्के, मुंबईत चेंबूर आणि मुलुंडमध्ये ४ टक्के, कोलकत्यात राजरहाट ३ टक्के आणि ईएम बायपास ५ टक्के, चेन्नईत पेराम्बूर आणि पल्लावरम भागात ४ टक्के, हैदराबादमध्ये हायटेक सिटी आणि गच्चीबाऊली भागात ५ टक्के आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : डाळींची टंचाई टाळण्यासाठी केंद्र सरकारची धावाधाव

महानगरनिहाय सर्वाधिक घरभाडे (१ हजार चौरस फूट सदनिका)

शहर – भाग – घरभाडे (रुपयांत)

बंगळुरू – सर्जापूर रस्ता – ३४ हजार

हैदराबाद – हायटेक सिटी – ३२ हजार ५००

पुणे – हिंजवडी – २६ हजार ५००

दिल्ली – गोल्फ कोर्स रस्ता – ४३ हजार

मुंबई – चेंबूर – ६२ हजार ५००

कोलकता – ईएम बायपास – २७ हजार

चेन्नई – पेराम्बूर – २१ हजार

हेही वाचा : काँग्रेसमुळे पुन्हा फाळणीचा धोका! सोलापूरच्या सभेत पंतप्रधानांचा आरोप

आगामी काळात घरभाड्यातील वाढ मंदावण्याची चिन्हे नाहीत. आगामी काही तिमाहींमध्ये घरांना मागणी वाढणार आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षातील पहिल्या दोन तिमाहीत घरभाडे जास्त राहील.

संतोष कुमार, उपाध्यक्ष, अनारॉक ग्रुप
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune house rent continuously increasing know the rent at different areas of pune city pune print news stj 05 css