पुणे : पुण्यात यावर्षी जानेवारी महिन्यात १६ हजार ३३० घरांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांच्या विक्रीत ८ टक्के घट झालेली आहे. प्रामुख्याने २५ लाख ते १ कोटी रुपये किमतीच्या घरांना मागणी कमी झालेली आहे. याचवेळी १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांच्या मागणीत वाढ नोंदविण्यात आली आहे.
नाइट फ्रँक इंडियाने पुण्याच्या मालमत्ता क्षेत्राचा जानेवारी महिन्याचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार, जानेवारीमध्ये १६ हजार ३३० घरांची विक्री झाली. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये १७ हजार ७८६ घरांची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे दीड हजार घरांची विक्री कमी झालेली आहे. यंदा जानेवारीत घरांच्या विक्रीतून ५९० कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क सरकारला मिळाले आहे. गेल्या वर्षी जानेवारीत ५८९ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले होते. घरांची विक्री कमी झाली असली तरी १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांच्या विक्रीत वाढ झाल्याने मुद्रांक शुल्क संकलनात घट झालेली नाही.
पुण्यात जानेवारीमध्ये विक्री झालेल्या एकूण घरांमध्ये १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांचे प्रमाण १५ टक्के आहे. गेल्या वर्षी याच काळात ते १३ टक्के होते. याचबरोबर २५ लाखांपेक्षा कमी किंमत असलेल्या घरांच्या विक्रीचे प्रमाण २४ टक्के असून, त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २ टक्के वाढ झाली आहे. मात्र, २५ ते ३० लाख रुपये किमतीच्या घरांच्या विक्रीचे प्रमाण ३० टक्के असून, त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २ टक्के घट झाली आहे. याचवेळी ५० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत किंमत असलेल्या घरांच्या विक्रीचे प्रमाण ३१ टक्के असून, त्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत २ टक्के घट झाली आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पुण्यातील घरांच्या विक्रीत जानेवारीमध्ये काही प्रमाणात घट झालेली आहे. मात्र, १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे. त्यातून उच्च मूल्याच्या घरांना ग्राहकांची वाढलेली पसंती दिसून येत आहे. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात आणखी कपात झाल्यानंतर परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत आगामी काळात वाढ होईल.
शिशिर बैजल, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, नाइट फ्रँक इंडिया
पुण्यातील घरांची विक्री
महिना – विक्री
जानेवारी २०२४ – १७,७८६
फेब्रुवारी २०२४ – १८,७९१
मार्च २०२४- २२,१८९
एप्रिल २०२४ – १४,२४४
मे २०२४ – १२,२८०
जून २०२४ – १४,६९०
जुलै २०२४ – १३,७३१
ऑगस्ट २०२४ – १३,६४५
सप्टेंबर २०२४ – ११,०५६
ऑक्टोबर २०२४ – २०,८९४
नोव्हेंबर २०२४ – १३,३७१
डिसेंबर २०२४ – १७,३४८
जानेवारी २०२५ – १६,३३०