पुणे : गणेश मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी शनिवारी शहराच्या मध्य भागात गर्दीचा महापूर लोटला. रविवारच्या सुटीपूर्वीची रात्र जागवीत गणेशभक्तांनी पहाटेला मानाच्या गणपतीचे दर्शन घेऊनच घराची वाट धरली. पावसाने विश्रांती घेतल्याने गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. मात्र, चौकाचौकांमध्ये होत असलेल्या ढोल-ताशा पथकांच्या स्थिरवादनाचा नागरिकांना मनस्ताप झाला. रस्ते बंद झाल्याने पायी चालणेही मुश्कील झाले होते. उपनगर आणि जिल्ह्यातून नागरिक सहकुटुंब गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी दाखल झाल्याने गर्दीमध्ये भर पडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौरींसह बहुतांश घरातील गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर गृहिणींना सवड मिळाल्यामुळे अनेकांनी सहकुटुंब रविवारच्या सुटीपूर्वीची रात्र गणेश मंडळांचे देखावे पाहण्याला प्राधान्य दिले. उत्सवाची सांगता मंगळवारी (१७ सप्टेंबर) होणार असल्याने देखावे पाहण्यासाठी आता केवळ दोनच दिवस हातामध्ये आहेत. ही पर्वणी साधून गणेश मंडळांना भेट देण्यासाठी उपनगरातील आणि जिल्ह्यातील नागरिकांनी शनिवारी दुपारपासूनच गर्दी केली होती. त्यामुळे शहरातील महत्त्वाचे रस्ते सायंकाळपासूनच वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. अनेकांनी आपली दुचाकी आणि चारचाकी वाहने जयंतराव टिळक पूल आणि काकासाहेब गाडगीळ पूल (झेड ब्रिज) येथे लावली होती. त्यामुळे हे पूल वाहतुकीसाठी बंद झाले होते. उपनगरातील नागरिकांनी शहरातील मध्य भागात येण्यासाठी मेट्रोचा वापर केल्याचे दिसून आले.

हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो प्रोफाइलला ठेवणारे अश्लील कमेंट कशी करू शकतात? रुपाली चाकणकरांची संतप्त प्रतिक्रिया

गणपतींच्या दर्शनासाठी झालेल्या गर्दीमुळे मध्य भागातील गल्ली-बोळातून पायी जाणेही मुश्कील झाले होते. रस्ते वाहतुकीसाठी बंद असतानाही अनेकांनी आपली वाहने आणल्यामुळे झालेली कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची त्रेधातिरपीट उडाली होती. छत्रपती शिवाजी रस्ता, थोरले बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यासह मध्य भागातील प्रमुख रस्ते सायंकाळनंतर वाहतुकीस बंद करण्यात आले.

मानाच्या मंडळांच्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून गर्दी झाली होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट, हुतात्मा बाबू गेनू मंडळाचे देखावे पाहण्यासाठी गर्दी झाली होती. गणरायाचे रूप डोळ्यात साठविण्याबरोबरच मोबाईलमध्ये टिपण्यासाठी सर्वांची लगबग सुरू होती. बाजीराव रस्त्यावरील नातूबाग मंडळ, चिमण्या गणपती मंडळ, वंदे मातरम् संघ, दिग्विजय मंडळाने साकारलेली संगीताच्या तालावर नर्तन करणारी विद्युत रोषणाई पाहण्यासाठी तरुणाईची गर्दी झाली होती. शनिपार मंडळाने साकारलेले वृंदावन, सदाशिव पेठेतील नवजवान मंडळाने साकारलेला शिव-पार्वती विवाह सोहळा, छत्रपती राजाराम मंडळाने साकारलेले दुर्ग्याणी मंदिर पाहण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. खजिना विहीर मंडळ, साने गुरुजी मित्र मंडळ, अकरा मारुती चौक मंडळ, सेवा मित्र मंडळ, खडकमाळ आळी मंडळ, हिराबाग मंडळाने साकारलेले देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

हेही वाचा : अल्पवयीन मुलीचा बळजबरीने विवाह प्रकरणी आई-वडिलांसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल; पीडिता गर्भवती झाल्यानंतर प्रकार उघड

गणरायाचे दर्शन घेत पायी चालताना किती अंतर कापले गेले याचे भानही भाविकांना राहिले नाही. थकलेली पावले उपाहारगृहांमध्ये पोटपूजा करण्यासाठी विसावली. भेळ, पावभाजी, पिझ्झा, बर्गर अशा खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतर सारे पुन्हा देखावे पाहण्यासाठी ताजेतवाने झाले. रात्र जागवून काढत अनेकांनी पहाटेनंतरच घरी परतण्याला प्राधान्य दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune huge crowd on streets on the occasion of ganeshotsav 2024 pune print news vvk 10 css