भव्य मिरवणुका, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, व्याख्याने, शिवपुतळ्याचे तसेच शिवप्रतिमेचे पूजन आदी कार्यक्रमांनी शहरात मंगळवारी श्रीशिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महापालिका शिक्षण मंडळाने भवानीमाता मंदिरापासून काढलेली मिरवणूक लक्षवेधी ठरली.
शिवजयंतीच्या मुख्य मिरवणुकीचा प्रारंभ भवानीमाता मंदिरापासून करण्यात आला. महापौर वैशाली बनकर, आमदार रमेश बागवे, नगरसेवक रवींद्र माळवदकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व राजकीय, सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अनेक संस्था व मंडळांचा सहभाग असलेली ही भव्य मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरून जाताना नागरिकांनी दुतर्फा उभे राहून शिवरायांचा जयजयकार केला. भगवे, केशरी फेटे बांधलेले तरुण तसेच विविध प्रसंग साकारणारे चित्ररथ या मिरवणुकीत होते. बँड, ढोल, लेझिमच्या तालावर तसेच शिवरायांचा जयजयकार करत निघालेली ही मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी झाली होती.
शिक्षण मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेली मिरवणूक सायंकाळी पाचच्या सुमारास भवानी पेठेतून सुरू झाली. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ, उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे, शिक्षण प्रमुख शिवाजी दौंडकर यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते. श्रीशिवरायांच्या जीवनावर आधारित अनेक देखावे या मिरवणुकीत पाहायला मिळत होते. हे चित्ररथ पाहताना चौकाचौकातील गर्दी विद्यार्थ्यांचेही कौतुक करत होती.
मराठा महासंघातर्फे दुष्काळग्रस्तांसाठी ‘दुष्काळग्रस्त भागासाठी हात मदतीचा’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियातर्फे शिवाजी महाराजांवरील पोवाडे गायनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील शिवाजीमहाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी मिरवणूक काढून शिवाजीमहाराजांना मानवंदना दिली. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच इंदिरा सार्वजनिक ग्रंथालय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अखिल भारतीय युवक मराठा महासंघ, छावा युवा संघटना, शहर महिला काँग्रेस कमिटी, प्रियदर्शनी शिक्षण संस्था, हमाल पंचायत, भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शिवाजी मराठा जिजामाता हायस्कूल आदी संघटनांच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Story img Loader