पुणे : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील लाेणीकंद भागात घडली. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी रात्रभर पत्नीच्या मृतदेहाशेजारी झोपला होता. मंगळवारी आई कामावर आल्याने मुलीने दुपारी घरी जाऊन पाहिले. तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
लक्ष्मीबाई बाबासाहेब जाधव (वय ४४, रा. बुर्केगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती बाबासाहेब मारुती जाधव (वय ५४) याला लोणीकंद पोलिसांनी मंगळवाारी सायंकाळी अटक केली. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी दिली.
हेही वाचा: IAS पूजा खेडकर दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी ‘वायसीएम’च्या ‘त्या’ डॉक्टरांना क्लीन चिट! चौकशीत निर्दोष
जाधव कुटुंब नगर रस्ता परिसरातील बुर्के गावात राहायला आहे. महिनाभरापूर्वी जाधव दाम्पत्याचा मुलगा पेरणे फाटा परिसरात राहायला गेला. त्यांना एक मुलगी असून, ती विवाहित आहे. बाबासाहेबला दारुचे व्यसन आहे. दारू पिऊन तो लक्ष्मीबाई यांच्याशी नेहमी वाद घालायाचा. लक्ष्मीबाई एका खासगी कंपनीत काम करत होत्या. त्यांची विवाहित मुलगी त्याच कंपनीत काम करत आहे. सोमवारी रात्री जाधव दाम्पत्यात पुन्हा वाद झाला. बाबासाहेबने लक्ष्मीबाई यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मीबाई यांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी कंपनीतील कामगारांना नेण्यासाठी बस आली. लक्ष्मीबाई कामावर न आल्याने कामावरून सुटल्यानंतर मुलगी घरी गेली. तेव्हा आई लक्ष्मीबाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे उघडकीस आले. घाबरलेल्या मुलीने त्वरित या घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक साळगावकर आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आरोपी बाबासाहेब लक्ष्मीबाई यांच्या चारित्र्याचा संशय घेत होता. संशयातून त्याने त्यांचा खून केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत मिळाली असल्याचे पोलीस निरीक्षक साळगावकर यांनी सांगितले.