पुणे : शहरात डेंग्यूचा संसर्ग वाढला असून, रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच वेळी इतर साथरोगांचा प्रादुर्भावही अधिक आहे. यामुळे रक्ताच्या पिशव्यांसह रक्तबिंबिकांची (प्लेटलेट) मागणी वाढली आहे. मात्र, शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्तासह रक्तबिंबिकांचा पुरेसा साठा नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना धावपळ करावी लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील ससून सर्वोपचार रुग्णालयातील रक्तपेढीत सध्या रक्ताच्या पिशव्यांसह रक्तबिंबिकांचा साठा कमी आहे. गेल्या महिन्यात पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे मोठी रक्तदान शिबिरे होऊ शकली नाहीत. याचबरोबर अनेक शिबिरांना पावसामुळे चांगला प्रतिसाद मिळू शकला नाही. यामुळे रक्तपेढ्यांतील साठ्यात फारशी वाढ झाली नाही. त्यातच साथरोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. यातून रक्तासह रक्तबिंबिकांची मागणी वाढली आहे. रक्तपेढ्यांमध्ये रक्त पिशव्या आणि रक्तबिंबिकांचा पुरेसा साठा नसल्याने त्यांची टंचाई निर्माण झाली आहे.

हेही वाचा : अनुंकपा तत्त्वावरील शिक्षकांना टीईटी अनिवार्यतेबाबत मोठा निर्णय… आता काय होणार?

याबाबत ससून सर्वोपचार रुग्णालयातील रक्तपेढीचे प्रमुख डॉ. महेश सागळे म्हणाले, की गेल्या महिन्यात रक्तपिशव्यांचा साठा कमी होता. गेल्या दोन-तीन दिवसांत रक्तदान शिबिरे सुरू झाल्याने साठा वाढला आहे. सध्या रक्तासह रक्तबिंबिकांसाठी मागणी वाढली आहे. या महिन्यात अनेक नियोजित रक्तदान शिबिरे आहेत. यामुळे रक्त पिशव्या आणि रक्तबिंबिकांची टंचाई कमी होण्यास मदत होईल.

इतर रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असला तरी आमच्याकडे पुरेसा साठा आहे. रक्तबिंबिकांचाही साठा आमच्याकडे पुरेसा आहे. नियमित रक्तदान शिबिरे सध्या सुरू असल्याने रक्त साठा वाढू लागला आहे.

डॉ. अतुल कुलकर्णी, संचालक, जनकल्याण रक्तपेढी

हेही वाचा : नारीशक्ती विकासावर राष्ट्रपतींचे भाष्य; म्हणाल्या, “हा देशाच्या विकासाचा मापदंड…”

पुण्यात डेंग्यू आणि चिकुनगुन्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. रुग्णालयात हे रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. या रुग्णांसाठी रक्तासह रक्तबिंबिकांची मागणी ३० ते ३५ टक्क्यांनी वाढली आहे. याचाच परिणाम होऊन रक्तपेढ्यांमध्ये रक्तासह रक्तबिंबिकांची टंचाई दिसून येत आहे.

डॉ. तनिमा बरोनिया, रुबी हॉल क्लिनिक
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune incline in dengue cases also shortage of blood and platelets pune print news stj 05 css