पुणे : देशात प्रथमच बायो-बिटुमिनचा वापर करून महामार्गाची बांधणी करण्यात आली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले आहे. नागपूर-मानसर बाह्यवळण प्रकल्पात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ या ठिकाणी बायो-बिटुमिनचा वापर करून महामार्ग बांधण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राज इंडस्ट्रीजच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या या तंत्रज्ञानामध्ये कच्च्या लिग्निनचे बायो-बिटुमिनमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. यामुळे जीवाश्म-आधारित बिटुमिनच्या जागी प्राजने हरित पर्याय उपलब्ध करून दिला आहे. याबाबत प्राजने म्हटले आहे की, जीवाश्म-आधारित बिटुमिनमध्ये १५ टक्क्यांपर्यंत बायो-बिटुमिन मिसळून वापरता येते. पारंपरिक बिटुमिनमध्ये १५ टक्के मिश्रण करण्यासाठी भारताला किमान १५ लाख टन बायो-बिटुमिनची आवश्यकता आहे. या माध्यमातून देशाची चार ते साडेचार हजार कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत होऊ शकेल, असा अंदाज आहे. असे घडल्यास शाश्वत आणि पर्यावरणपूरक रस्ते व पायाभूत सुविधांच्या उभारणीच्या दिशेने आपण एक परिवर्तनकारी पाऊल टाकण्यास यशस्वी होऊ.

हेही वाचा : उच्च शिक्षणातील बदलांचे शाळेपासूनच मार्गदर्शन, आता ‘स्कूल कनेक्ट २.०’

कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर) व सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट (सीआरआरआय) यांच्या सहकार्याने व प्राजच्या वतीने लिग्निन-आधारित बायो बिटुमिन नमुन्याची चाचणी करण्यात आली. पारंपरिक बिटुमिनमध्ये १५ टक्के बायो-बिटुमिनचे मिश्रण करण्यात येते. या बायो-बिटुमिनचा वापर करून गुजरातमधील हलोल येथे प्राजच्या वतीने सेवा रस्ताही तयार करण्यात आला. या रस्त्याचे २ वर्षे आणि ३ पावसाळी ऋतू असे निरीक्षण केल्यानंतर सीएसआयआरने या रस्त्याचे परीक्षण करून समाधानकारक निष्कर्ष नोंदवले. ही यशस्वी चाचणी नागपूर-मानसर प्रकल्पाच्या उभारणीत एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

बिटुमिन म्हणजे काय?

बिटुमिन हे कच्च्या तेलाच्या विभाजनामुळे तयार होणारे हायड्रोकार्बनचे काळे चिकट मिश्रण असते. रस्ते बांधणीत सर्व घटकांना एकत्रित बांधण्याचे कार्य ते करते. पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार २०२३- २४ साली देशाचा बिटुमिनचा वापर हा ८८ लाख टन होता. चालू आर्थिक वर्ष २०२४– २५ मध्ये तो १०० लाख टनांवर जाण्याची शक्यता आहे. यातील ५० टक्के बिटुमिन आयात केले जाते. त्यामुळे देशाला वार्षिक २५ ते ३० हजार कोटी रुपयांचा आयात खर्च येतो. याला लिग्नन आधारित बायो-बिटुमिनचा पर्याय आता उपलब्ध झाला आहे.

हेही वाचा : नवे वर्ष ‘एआय’चे; शिक्षण संस्थांना काय करावे लागणार?

लिग्निन-आधारित बायो-बिटुमिनचा वापर करून भारतातील पहिल्या शाश्वत रस्त्याचे उद्घाटन होणे, हा अभिमानाचा क्षण आहे. हे अभिनव बायो-बिटुमिन हे जीवाश्म-आधारित बिटुमिनला समर्थ पर्याय म्हणून काम करेल.

डॉ. प्रमोद चौधरी, कार्यकारी अध्यक्ष, प्राज इंडस्ट्रीज
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune india s first national highway constructed with bio bitumen inaugurated by nitin gadkari pune print news stj 05 css