पुणे : ससून रुग्णालयातील कैदी पलायनप्रकरणी चौकशीसाठी नेमलेल्या समितीकडून रुग्णालयाच्या प्रशासनाची चौकशी सुरू आहे. समितीने २०२० सालापासून आतापर्यंत रुग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक कैदी रुग्णाचे अहवाल मागविले आहेत. रुग्णालयात वर्षाला सुमारे अडीचशे कैदी रुग्ण दाखल होतात. त्यामुळे मागील चार वर्षांतील दाखल हजारभर कैदी रुग्णांचे अहवाल बनविण्याचे काम आता ससूनमध्ये सुरू आहे.
ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचा सूत्रधार ललित पाटील याने पलायन केल्याप्रकरणी राज्य सरकारने चार जणांची चौकशी समिती नियुक्त केली.
या समितीकडून शुक्रवारी (ता.१३) दिवसभर अधिष्ठाता कार्यालयात चौकशीचे सत्र सुरू होते. त्यात अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरणकुमार जाधव, कैदी रुग्ण समितीचे अध्यक्ष डॉ. सुजित धिवारे, कैदी रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, कैदी कक्ष क्रमांक १६ मधील कर्मचाऱ्यांसह शिपायांची चौकशी केली होती.
समितीने २०२० पासून आतापर्यंत ससून रुग्णालयात दाखल झालेल्या कैदी रुग्णांचा अहवाल मागितला आहे. त्यात कैदी रुग्ण, त्यांचा आजार, उपचार, रुग्णालयात दाखल असलेला कालावधी, उपचार करणारे डॉक्टर आदी माहितीचा समावेश आहे. ससूनमध्ये वर्षभरात सुमारे अडीचशे कैदी रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. मागील चार वर्षांतील सुमारे हजारभर रुग्णांचे अहवाल समितीसमोर सादर करावे लागणार आहेत. हे अहवाल बनविण्याचे काम ससून प्रशासनाकडून सुरू आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत हे अहवाल समितीला सादर करण्यात येतील, असे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा : पुण्यात सातबारा उताऱ्यांत बदल करून जमिनी हडप; राज्य सरकारने दिले ‘हे’ आदेश
कारवाई कोणावर होणार?
चौकशी समितीसमोर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कनिष्ठ अधिकाऱ्यांवर खापर फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा ससूनमध्ये सध्या सुरू आहे. या प्रकरणी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हात झटकण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे समितीकडून नेमकी कारवाई कोणावर होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.