पुणे : आमच्या कुटुंबातील मुलाला संरक्षण दिले यासाठी गृहमंत्र्यांचे आभार, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी या विषयावर बोलण्याचे टाळले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी निवडणुकीच्या काळात अनेकांना पुरविण्यात आलेली सुरक्षा काढून घेतली होती. त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलांनाच वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा : पोलीस आयुक्तांचा गुंडांना इशारा : म्हणाले, “पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’ नाही, आता ‘हा’ पॅटर्न…”
पार्थ अजित पवार यांनी २०१८ मध्ये राजकारणामध्ये प्रवेश केला. वडील अजित पवार आणि आजोबा शरद पवार यांच्याकडून त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले होते. त्यांनी मुंबईच्या एचआर महाविद्यालयातून पदवी मिळवली. त्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी ते लंडनला गेले होते. २०१९ मध्ये त्यांनी मावळमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. पार्थ पवार यांना दिलेल्या वाय दर्जाच्या सुरक्षेबाबत शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाला जयंत पाटील यांनी उत्तर दिले. आम्ही मुलांबाबत काही बोलू इच्छित नाही, आमच्या कुटुंबातील मुलाला संरक्षण दिले यासाठी गृहमंत्र्यांचे आभार, असे पाटील म्हणाले.