पिंपरी : चंपाषष्ठीनिमित्त श्री खंडोबारायाच्या चरणी तिने संपूर्ण कुटुंबाला सुखी ठेवण्याची प्रार्थना केली. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. परतीच्या प्रवासात अपघातात त्या माउलीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतरही परवड थांबली नाही. पार्थिव रुग्णालयात नेताना त्या माउलीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण गायब झाले. आता ते कुणी चोरून नेले, की गहाळ झाले, याचा शोध सुरू आहे.
मोठ्या सरकारी पदावरून निवृत्त झालेले अधिकारी आणि त्यांची पत्नी शनिवारी चंपाषष्ठीनिमित्त दुचाकीवरून खेड तालुक्यातील श्रीक्षेत्र खरपुडी येथे खंडेरायाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन घरी परतताना पुणे-नाशिक महामार्गावर दुपारी पावणेदोनच्या सुमारास वाकी गावाच्या हद्दीत त्यांच्या दुचाकीला भरधाव गाडीने धडक दिली. धडकेत दोघेही रस्त्यावर पडले. पती किरकोळ जखमी झाले. मात्र, पत्नीच्या डोक्यावरून गाडीचे मागील चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
हेही वाचा : पिंपरी- चिंचवड: अनधिकृत भंगार गोदामात बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे; आमदार महेश लांडगे
पत्नीचा निपचित पडलेला देह पाहून पतीला मानसिक धक्का बसला. घटनास्थळी मोठी गर्दी झाली. रुग्णवाहिका बोलावून मंगल यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनासाठी दुपारी दोन वाजता महिलेचा मृतदेह रुग्णवाहिकेतून चाकण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. त्या वेळी यांच्या गळ्यात पाच तोळ्यांचे सोन्याचे गंठण होते. मात्र, सव्वादोनच्या सुमारास महिलेचे नातेवाइक रुग्णालयात आले असता, गंठण गायब झाल्याचे निदर्शनास आले.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवड: “अनधिकृत गोदामांवर नंतर बोलू आधी आग विझवू”, अतिरिक्त आयुक्तांची अनधिकृत गोदामांना बगल!
दाम्पत्याचा अपघात झाला, त्या वेळी पत्नीच्या गळ्यात सोन्याचे गंठण होते. मात्र, शवविच्छेदनासाठी मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर पत्नीच्या गळ्यात गंठण नसल्याचे नातेवाइकांच्या निदर्शनास आले. गंठण चोरीला गेले, की गहाळ झाले, या दोन्ही बाजूंनी तपास सुरू असल्याचे चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर. बी. मोरे यांनी सांगितले.