पुणे : चर्चेत असणाऱ्या येरवड्यातील कल्याणीनगर भागात पुन्हा एकदा हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत धांगडधिंगा सुरू असल्याचे समोर आले आहे. नियमबाह्य पद्धतीने रात्री उशिरापर्यंत तब्बल ७० ते ८० नागरिक एकत्रित करून साऊंड सिस्टीम सुरू ठेवल्याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात दोन हॉटेलच्या मालकांवर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कल्याणीनगर येथील एका हॉटेलचे मालक तसेच मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलीस अंमलदार प्रवीण खाटमोडे यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी रात्री उशिरा कल्याणीनगर येथील एका हॉटेलवर पोलिसांनी छापा कारवाई केली. त्यावेळी हॉटेलमध्ये विनापरवाना रात्री साऊंड सिस्टीम सुरू असल्याचे आढळून आले. तर, यावेळी हॉटेलमध्ये ४८ नागरिक उपस्थित होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने संबंधित हॉटेल मालक, मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर, दुसऱ्या कारवाईत कल्याणीनगर येथीलच हॉटेलवर छापा टाकून कारवाई केली. त्यावेळी येथेही २५ ते ३० नागरिक आढळून आले. उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवून त्यामध्ये अवैधरीत्या साऊंड सिस्टीम सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेलचे मालक व मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : पिंपरी: आम्ही इथले भाई; आमच्यासोबत भिडण्याची कुणाची हिंमत नाही, अन्यथा…३०२
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणानंतर या भागात रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे हॉटेल, पबचा मुद्दा समोर आला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलीस, उत्पादन शुल्क विभागाने येथे कारवाई करून तब्बल २० हून अधिक पबला टाळे ठोकले. मात्र, काही दिवसांतच या भागातील हॉटेल, पब संस्कृती पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः कल्याणीनगर भागात हे प्रमाण सर्वाधिक आहे. रात्री उशिरापर्यंत हॉटेल आस्थापना सुरू राहत असल्याने येथील रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा याबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे आलेल्या आहेत. मात्र, तरीही हे प्रकार सुरूच आहेत.