पुणे : कामशेतमधील राऊतवाडी येथील आदिवासी पाड्यावरील गर्भवती आणि तिची दोन मुले दूषित पाण्यामुळे गंभीररित्या आजारी पडली. अतिसारामुळे त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना ससून सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी महिलेवर उपचार करीत असतानाच तिच्या दोन मुलांवर स्वतंत्रपणे उपचार केले. या कालावधीत कर्मचारीच या मुलांची पालकांप्रमाणे काळजी घेत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राऊतवाडी येथील आदिवासी पाड्यावर दूषित पाण्यामुळे एकाच कुटुंबातील तिघे आजारी पडले. त्यात सात महिन्यांती गर्भवती आणि तिचा २ वर्षांचा मुलगा आणि ७ वर्षांची मुलगी यांचा समावेश होते. अतिसारामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. या तिघांचे कुपोषण होऊन त्यांच्या मूत्रपिंडाचा त्रासही सुरू झाला होता. रुग्णवाहिकेतून या तिघांना ससून रुग्णालयात २ जुलैला दाखल करण्यात आले. या महिलेला स्त्रीरोग विभागात तर मुलांना बालरोग विभागात दाखल करण्यात आले.

हेही वाचा : Maharashtra Rain News: राज्यात चार दिवस पावसाचा जोर कमी

रुग्णालयात संबंधित महिलेची तपासणी केली त्यावेळी तिच्या गर्भाचा पोटातच मृत्यू झाल्याची बाब निष्पन्न झाली. तिला याची माहिती नव्हती. गर्भाचा मृत्यू झाल्याने महिलेची प्रकृती गंभीर बनली होती. स्त्रीरोग विभागाचे प्रमुख डॉ. संजयकुमार तांबे यांच्या नेतृत्वाखाली उपचार सुरू करण्यात आले. महिलेची क्रिएटिनिन पातळी वाढली होती. डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर केली.

याचवेळी दोन मुलांवर बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. आरती किणीकर यांच्या नेतृत्वाखाली उपचार सुरू होते. या मुलांना दोन दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. मुलांची आई स्त्रीरोग विभागात उपचार घेत असल्याने त्यांचे वडील तिथे थांबले होते. या कालावधीत बालरोग विभागातील कर्मचाऱ्यांनी या मुलांची काळजी घेतली. त्यांना मानसिक आधार देण्यासोबत त्यांची सेवा केली. महिलेची प्रकृती थोडी बरी होताच तिघांना औषधशास्त्र विभागात हलविण्यात आले. तिथे डॉ. सोनाली साळवी यांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर १६ जुलैला रुग्णालयातून सोडण्यात आले.

हेही वाचा : पिंपरी: नदीकाठच्या रहिवाशांचे कायमस्वरूपी पुनर्वसन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

रुग्णालयातून घरापर्यंत पोहोचविले

महिलेसह तिच्या दोन्ही मुलांची प्रकृती सुधारल्यानंतर ससूनमधून सोडण्यात आले. या महिलेचा पती हा शेतमजूर असल्याने त्याच्याकडे घरी जाण्यासाठीही पैसे नव्हते. अखेर रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक मोहनीश निकम यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. या रुग्णवाहिकेतून त्यांनी या कुटुंबाला घरी सुखरूप सोडले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune kamshet s tribal woman and her two children treatment at sassoon hospital pune print news stj 05 css