पुणे : शहरात सर्वाधिक मतदानाची नोंद करण्याचा विक्रम कसबा विधानसभा मतदारसंघाने नाेंदविला असला, तरी वाढलेला मतटक्का उमेदवारांची धडधड वाढविणारा ठरला आहे. पाच वर्षांपूर्वी झालेली निवडणूक, तसेच दोन वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीचा विचार करता तब्बल दहा टक्क्यांनी वाढलेले मतदान आपल्यालाच विजयपथावर नेईल, असा दावा महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार, तसेच अपक्ष असलेल्या पुण्याच्या पहिल्या महिला महापौर किती मतांची बेगमी करतात, यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कसबा विधानसभा मतदारसंघात यंदा साठ टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याने निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीच्या तुलनेत तब्बल दहा टक्क्यांनी, तर सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षाही या निवडणुकीमध्ये मतांची टक्केवारी वाढली आहे.

थंडीमध्ये सकाळीच फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या शनिवार, नारायण आणि सदाशिव पेठेतील मतदारांनी थेट मतदान केंद्र गाठून मतदानाचा अधिकार बजावला. त्यामुळे पहिल्या दोन तासांच्या टप्प्यात मतदानाला वेग आला. सकाळी अकरा वाजेपर्यंत १८ टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. महात्मा फुले पेठ, रविवार पेठ, गुरुवार आणि शुक्रवार पेठेतील मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या. उमेदवारांसह प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांनी सकाळच्या टप्प्यात, तर वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केलेले ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी दुपारनंतर मतदान केले.

दुपारी मतदानाची गती संथ झाली होती. चारनंतर मतदानाचा वेग वाढला, तसा टक्काही वाढला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५४ टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. अनेक केंद्रांवर सायंकाळी सहानंतरही मतदानासाठी रांगा लागल्या होत्या, तर काही केंद्रांवरील मतदान सायंकाळी सातनंतरही सुरू होते. मॉक पोल झाल्यानंतर यंत्र बंद पडल्यामुळे पाच केंद्रांवर सकाळी मतदानाला अर्धा तास उशीर झाला. भगव्या टोप्या परिधान करून बसलेल्या महायुतीचे कार्यकर्त्यांविषयी आक्षेप घेण्यात आला. त्यावरून किरकोळ वादावादीच्या घटना घडल्या. छत्रपती शिवाजी महाराज आणि राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे छायाचित्र बूथवर लावून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर दिले. किरकोळ घटनांचा अपवादवगळता मतदान सुरळीत पार पडले.

हे ही वाचा… मावळमध्ये मतदानाचा उच्चांक कोणाला मारक?

कसबा विधानसभा मतदार संघ

२०१९ – ५१.६२
२०२२- ५०.०६

लोकसभा – ५९.२४

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune kasba assembly constituency voter turnout percentage increase affects candidates enthusiasm pune print news vvk 10 asj