पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये केवळ ४३ हजार ४५६ चौरस मीटर जागेचे भूसंपादन करण्यात महापालिकेला यश आले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम नक्की कधी पूर्ण होऊन वाहनचालकांना दिलासा मिळणार हे अद्यापही निश्चित झालेले नाही.

शहराच्या दक्षिण भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविण्यासाठी सहा वर्षांपूर्वी महापालिकेने कात्रज ते कोंढवा या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेला प्रयत्न करावे लागत आहेत. रस्त्याच्या भूसंपादनासाठी सुमारे ७१० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. पूर्वी ८४ मीटर रुंदीकरण करण्यात येणारा हा रस्ता आता ५० मीटर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

रस्त्याची रुंदी कमी केल्याने या भूसंपादनाचा खर्च २८० कोटी रुपये इतका येणार होता. यापैकी राज्य सरकारकडून १४० काेटी रुपयांचा निधी महापालिकेच्या तिजाेरीत जमा झाला आहे. या निधीतून रस्त्यासाठी जागा दिलेल्या जागामालकांना भरपाई देणे महापालिकेने सुरू केले आहे. तसेच, या भागांत ग्रेड सेपरेटरचे कामदेखील सुरू करण्यात आले आहे. ज्या जागा महापालिकेच्या ताब्यात आल्या तेथे रस्ता बांधला जात असल्याचे मालमत्ता विभागाचे प्रमुख महेश पाटील यांनी सांगितले.

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या ५० मीटर रुंदीसाठी ९४ हजार चौरस मीटर जागेचे भूसंपादन करणे आवश्यक आहे. त्यापैकी ४३ हजार ४५६ चौरस मीटर जागा महापालिकेच्या ताब्यात आली आहे. उर्वरित जागा ताब्यात घेण्यासाठी संबंधित मालकांशी चर्चा सुरू आहे.

महेश पाटील, मालमत्ता विभाग प्रमुख, पुणे महापालिका