पुणे : पुण्यातील ३३ वर्षीय रुग्णाच्या पोटात सातत्याने दुखणे, लघवीला त्रास होणे आणि सातत्याने मूत्रमार्गात संसर्ग होणे असा त्रास होत होता. तपासणीत त्याच्या दोन्ही मूत्रपिंडांमध्ये खडे आढळले. त्याच्या डाव्या मूत्रपिंडात ५.१ सेंटिमीटरचा मोठा खडा होता आणि उजव्या मूत्रपिंडामध्ये १.६ सेंटिमीटरचा खडा होता. खड्याचा आकार आणि जटिलता लक्षात घेऊन डॉक्टरांनी थुलियम फायबर लेझरसह रेट्रोग्रेड इंट्रारीनल सर्जरीचा वापर करून यशस्वीपणे उपचार केले.
रेट्रोग्रेड इंट्रारीनल सर्जरी (आरआयआरएस) ही कमीत कमी चिरफाड करणारी एंडोस्कोपी प्रक्रिया असून, याचा उपयोग अगदी अचूकपणे मूत्रपिंडातील खडे काढण्यासाठी केला जातो. या प्रक्रियेमध्ये अगदी पातळ आणि लवचीक स्कोप मूत्रमार्गातून मूत्रपिंडामध्ये सोडला जातो. या स्कोपच्या माध्यमातून लेझरचा वापर करून मूत्रपिंडातील खडे फोडले जातात. त्यानंतर हे फोडलेले खडे मूत्रपिंडातून बाहेर काढले जातात. या अत्याधुनिक पद्धतीच्या वापरामुळे रुग्णाला कमी दिवस रुग्णालयात राहावे लागते. तसेच, कमी त्रास होतो. मूत्रपिंडाचे संरक्षण होऊन खडा संपूर्णपणे काढून टाकला जातो.
याबाबत खराडीतील मणिपाल हॉस्पिटलमधील मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. अंकित शर्मा म्हणाले, की मूत्रपिंडातील खडे मोठे असल्यास त्यावर वेगाने तातडीने उपचार न केल्यास रुग्णाला दीर्घकालीन समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. काही वेळा मूत्रपिंड खराब होण्याचा धोकाही निर्माण होतो. साधारणपणे अशा मोठ्या खड्यांसाठी मूत्रपिंडामध्ये छोटे छिद्र पाडून खडे फोडून बाहेर काढले जातात. आता अत्याधुनिक अशा तंत्रामुळे एंडोस्कोपीमुळे हा खडा काढून टाकणे शक्य होते. थुलियम फायबर लेझरचा वापर केल्याने अचूकपणे खडा फोडून बाहेर काढता येतो.
उन्हाळ्यात मुतखड्याचा त्रास जास्त
मुतखड्याची समस्या सर्वसाधारणपणे उन्हाळ्यात वाढते. कारण शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे लघवीतील क्षारांचे खडे होऊ लागतात. हे खडे ५ मिलिमीटरपेक्षा लहान आकाराचे असतील, तर ते नैसर्गिकरीत्या पडून जातात. यापेक्षा मोठ्या आकाराचे खडे असल्यास आधुनिक वैद्यकीय उपचार करणे आवश्यक असते. आता अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्येही लवकर निदान आणि शस्त्रक्रिया करून रुग्ण जलद बरा होऊ शकतो. नागरिकांनी उन्ह्याळ्यात पुरेसे पाणी पिण्यावर भर दिल्यास मुतखड्याची समस्या उद्भवणार नाही, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.