पुणे : वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करुन कोयत्याचा धाक दाखविण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी महेश विलास लोणकर (वय ३१, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) याच्यासह त्याच्या पत्नीविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस शिपाई किरण झेंडे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई झेंडे आणि मेमाणे कोंढव्यातील शिवनेरीनगर परिसरात बुधवारी रात्री गस्त घालत होते. त्यावेळी शिवनेरीनगर परिसरात कोंडी झाली होती. वाहतूक कोंडी साेडविण्यासाठी झेंडे आणि मेमाणे गेले. त्यावेळी गर्दीत कोयता उगारुन आरोपी महेश लोणकर वाहनचालकांना धाक दाखवित होता. या भागातील रहिवाशांना त्याने शिवीगाळ केली. या घटनेची माहिती मिळताच झेंडे आणि मेमाणे तेथे गेले.

पोलिसांनी कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पोलिसांना पाहताच लोणकरच्या पत्नीने त्याच्याकडील कोयता काढून घेऊन लपविला. कोंडी सोडविणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ, तसेच धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी लोणकर याच्यासह त्याच्या पत्नीविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या लोणकर दाम्पत्याचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करत आहेत.

हे ही वाचा…वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेचे मोठे पाऊल; हॉटेल, ढाबा, बेकरीसाठी गॅसचा वापर सक्तीचा

शहरात गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना धक्काबुक्की करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या एका पोलीस शिपायाच्या पोटात लाथ मारण्याची घटना हडपसर भागातील गंगानगर परिसरात घडली होती. हडपसर भागातील सराइत आणि साथीदाराने भांडणे सोडविणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याची घटना महिनाभरापूर्वी घडली होती.