पुणे : वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी महंत रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वादग्रस्त वक्तव्य करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत ॲड. तौसिफ चाँद शेख (वय ३२, रा. एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १९२, १९६,१९७, २९९, ३०२, ३५३ (२), ३५६(२), ३५६(३) या कलमंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा : Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले; म्हणाले, “नालायकांनो पंधराशे रुपयात…”
ॲड. तौसिफ शेख आझाद समाज पार्टी (कांशीराम) पक्षाचे पदाधिकारी आहेत. सहदेव महंत रामगिरी महाराज (रा. सदगुरु श्री गंगागिरी महाराज संस्थान, सराला बेट, जि. नगर) यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण केली. यातून आमच्या धार्मिक भावना दुखवल्या गेल्या आहेत. त्यांचे भाषण समाजमाध्यमात प्रसारित करण्यात आले, असे ॲड. शेख यांनी फिर्यादीत म्हटले आहे. कोंढवा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.