पुणे: रंग टाकल्याचा जाब विचारल्याने युवती आणि तिच्या भावावर टोळक्याने कोयत्याने वार केल्याची घटना धुळवडीच्या दिवशी येरवड्यात घडली. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला येरवड्यातील यशवंतनगर भागात राहायला आहेत. महिलेला दोन मुली असून अकरा वर्षांचा मुलगा आहे. धुळवडीच्या दिवशी १७ वर्षांची युवती घरासमोर असणाऱ्या किराणा माल दुकानात खरेदीसाठी गेली होती. त्या वेळी आरोपींनी तिच्यावर अंगावर रंग टाकला. रंग टाकण्यावरुन वादावादी झाली.
त्यानंतर युवतीची लहान बहीण आणि अकरा वर्षांचा भाऊ घरातून बाहेर आले. त्यांनी टोळक्याला जाब विचारला. तेव्हा टोळक्याने लहान बहिणीवर कोयत्याने वार केला. तिच्याबरोबर असलेल्या भावाला दगड फेकून मारला. दगड डोक्यात लागल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेतील दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक विभुते तपास करत आहेत.
संगीत कार्यक्रमात तरुणाला मारहाण
धुळवडीनिमित्त आयोजित करण्यात आलेला कार्यक्रमात तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना कोरेगाव पार्क भागात घडली. याप्रकरणी मुंढवा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अंकित माणकेश्वर सिंग (वय २६, रा. केशवनगर, मुंढवा) याने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकित धुळवडीच्या दिवशी कोरेगाव पार्क भागात आयोजित करण्यात आलेल्या संगीत कार्यक्रमास गेला होता. त्या वेळी टोळक्याशी त्याचा वाद झाला. टोळक्याने त्याला धक्का देऊन मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक कल्पना सुरवसे तपास करत आहेत.
रंग लावल्याने मारहाण
रंग लावल्याने झालेल्या वादातून एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना कात्रज भागात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत रोहित भगवान पाटील (वय २१, रा. संतोषनगर, कात्रज) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धुळवडीच्या दिवशी रोहित हा कात्रज भागातील संतोषनगर परिसरातून निघाला होता. आरोपींनी त्याला रंग लावण्याचा प्रयत्न केला. रोहितने त्यांना जाब विचारला. वादातून आरोपींनी त्याला दगडाने मारहाण केली, तसेच डोक्यात कडे मारले. मारहाणीत पाटील जखमी झाला. पोलीस हवालदार ए. पी. भोसले तपास करत आहेत.