पिंपरी : चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टीत तीन जणांनी कोयता, लोखंडी रॉड, सिमेंट गट्टू या हत्यारांसह दहशत माजवत महिलेसह चौघांवर जीवघेणा हल्ला केला. परिसरातील आठ ते नऊ वाहनांची तोडफोड केली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. सुभाष भारत शिंदे (वय २५, रा. आनंदनगर झोपडपट्टी, कुपर कोपरा, चिंचवड), त्यांचे मामा साहेबराव म्हस्के, आत्या लक्ष्मी म्हस्के आणि बबन गायकवाड अशी जखमींची नावे आहेत. सुभाष शिंदे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नरेश उर्फ कृष्णा भंडारी (वय १९), आदित्य आणि त्यांचा एक साथीदार (सर्व रा. आनंदनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा : पिंपरीत अजित पवारांची भाजपवर कुरघोडी! भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या कामांचे लेखापरीक्षण करण्याची भूमिका
चिंचवड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी याबाबत माहिती दिली. मध्यरात्री फिर्यादी शिंदे यांच्या घरांसमोर पार्क केलेल्या वाहनांची आरोपी तोडफोड करत होते. टोळक्याचा धुडगूस सुरू असताना फिर्यादी शिंदे यांच्यासह परिसरातील
नागरिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दहशत माजवत आरोपींनी नागरिकांवर कोयता, लोखंडी रॉड, सिमेंट गट्टू या हत्यारांनी हल्ला केला. यात शिंदे यांच्यासह चार जण गंभीर जखमी झाले. आरोपींच्या तोडफोडीत आठ ते नऊ वाहनांचे नुकसान झाले. त्यानंतर नागरिकांनी तोडफोड करणार्यांना चांगला चोप दिला. यात आरोपी नरेश हा जखमी झाला. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.