पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा ससून रुग्णालयामधून पळून गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले आहे. या सर्व घडामोडी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिवाजीनगर येथील मेट्रो स्टेशनच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी अजित पवार यांना ललित पाटील प्रकरणी विचारले असता ते म्हणाले की, ललित पाटील प्रकरणी जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडक शासन केले जाईल,अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली आहे. तसेच या प्रकरणी ससून रूग्णालय किंवा पोलीस प्रशासनामधील कोणताही अधिकारी असो त्याची गय केली जाणार नसल्याचं त्यांनी सांगितले.
हेही वाचा : पुणे: मोदी पुन्हा सत्तेवर आले तर भारत जगातील तिसरी महासत्ता
तसेच ते पुढे म्हणाले की, तरुण पिढीला बरबाद करण्याच काम ड्रग्स माफिया करीत आहे. त्यामुळे कायद्यात बदल करून अशा आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. तसेच दूध, पनीर यांसह अनेक पदार्थामध्ये भेसळ करणार्यांना देखील कडक शासन झालं पाहिजे, अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली. पण आता यापुढील काळात ससून रुग्णालयासारखी पुनरावृत्ती होऊ नये, अशा सूचना देखील त्यांनी अधिकारी वर्गाला केल्या.