पुणे : ‘मी लहानाचा मोठा झालो त्या समाजात ज्ञानपरंपरेचा अभाव होता. त्यामुळे मी वाचन किंवा लेखन करावे, असा आग्रह धरणारे कोणीच नव्हते. अशा काळात डाॅ. अनिल अवचट यांच्यासारखा मित्र आयुष्यात आला नसता तर माझे जीवन भरकटलेलेच होते. मी लेखन करावे या अनिलने केलेल्या आग्रहामुळेच माझी ‘उपरा’कार ही केवळ ओळखच झाली नाही तर, हा उपराकार कानाकोपऱ्यात पोहोचला,’ अशी कृतज्ञ भावना लक्ष्मण माने यांनी मंगळवारी व्यक्त केली.
मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने लक्ष्मण माने लिखित ‘अनिल’ या डाॅ. अनिल अवचट यांच्यावरील आठवणींवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी माने बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव अध्यक्षस्थानी हाेते. ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आणि प्रकाशक अखिल मेहता या वेळी उपस्थित होते.
प्रत्येक कठीण प्रसंगी बाबा आढाव आणि अनिल अवचट माझ्याबरोबर उभे राहिल्यामुळे मी सावरलो. अनिल शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत होता आणि बाबा आढाव वयाच्या नव्वदीतही कार्यरत आहेत. त्यांच्याकडे पाहून मला लढण्याची आणि कार्यरत राहण्याची प्रेरणा मिळते, असे माने यांनी सांगितले.
वैद्य म्हणाले, प्रस्थापित सारस्वतांच्या साहित्यिक परंपरेला छेद देत अनिल अवचट यांनी लेखन केले. त्यांच्या साहित्यामध्ये वंचितांच्या जगण्याची कथा आणि वेदनेचे काव्य आहे. भटक्यांच्या जगण्याची अभिव्यक्ती हीदेखील साहित्याची भाषा होऊ शकते, हे माने यांच्या ‘उपरा’ने सिद्ध केले.
कोणताही समाज उन्नतीच्या वाटेवर आहे का, हे तपासण्याची फुटपट्टी म्हणजे त्या समाजातील कलात्मक सृजनशीलता आणि चिंतनशीलता याची बैठक होय. डॉ. अनिल अवचट यांनी सारस्वतांच्या साहित्यिक चौकटी मोडून शोषितांचे जगणे मांडले. त्याअर्थी कलात्मक सृजनशीलता आणि चिंतनशीलता हा अवचट यांच्या लेखनाचा गाभा होता. चळवळीतील आमच्यासह सगळ्यांनाच समस्यांकडे पाहण्याचा आणि त्या समस्या हाताळण्याचा एक निकोप दृष्टिकोन आणि एक नवीन आयाम देणारा अनिल म्हणजे माणुसकीचा ओतप्रोत झरा होता.
डाॅ. बाबा आढाव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते