पुणे : पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्ता सोमवारी (११ डिसेंबर) वाहनविरहित ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सोमवारी सकाळी दहा ते सायंकाळी आठ या कालावधीत लक्ष्मी रस्ता वाहतुकीसाठी आणि पार्किंगसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नगरकर तालीम चौक ते गरूड गणपती चौकादरम्यान पादचाऱ्यांना विनाअडथळा चालता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पादचाऱ्यांच्या सुविधेसाठी महामेट्रोकडून डेक्कन मेट्रो स्थानक ते महापालिका भवन स्थानक या दरम्यान सायकली उपलब्ध करून देण्यात येणार असून, पीएमपीकडून ज्यादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पादचाऱ्यांना विनाअडथळा चालता यावे, यासाठी वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा : अट्टल घरफोड्या करणाऱ्या मुंबईच्या सराईत गुन्हेगारांना वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या, २४ घरफोड्या केल्याचं निष्पन्न

महापालिकेच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून ११ डिसेंबर रोजी पादचारी दिन आयोजित केला जात आहे. पादचारी दिन साजरा करणारे पुणे देशातील पहिले शहर ठरले आहे. पादचारी दिनानिमित्त यंदाही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याबाबतची माहिती पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. वाहतूक पोलीस, लक्ष्मी रस्ता व्यापारी संघटना आणि पथारी संघटनेच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

लक्ष्मी रस्त्यावरील नगरकर तालीम चौक ते गरूड गणपती चौक आकर्षक पद्धतीने सजविण्यात येणार आहे. शहराच्या विविध भागात पदपथांची देखभाल दुरुस्ती करून पादचाऱ्यांना पदपथावरून विनाअडथळा चालता येईल, अशी व्यवस्था केली जाणार आहे. शहरातील शंभर महत्त्वाच्या चौकांत पादचारी सुरक्षेबाबत उपाययोजना केल्या जात आहेत. या दिवशी लोकप्रबोधनासाठी आणि नागरिकांच्या करमणुकीसाठी विविध कार्यक्रम केले जातील. सामान्य नागरिकांनाही कला सादर करण्याची संधी मिळणार असून ‘वाॅकिंग प्लाझा’चे व्यासपीठ त्यांच्यासाठी खुले राहणार आहे. महापालिका अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन नागरिकांना सादरीकरण करता येणार आहे, अशी माहिती पावसकर यांनी दिली. लक्ष्मी रस्त्याला नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या उपक्रमाच्या निमित्ताने या रस्त्याला नवे रूप येणार असून या दिवशी खासगी गाड्यांचा वापर करू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा : जेजुरीत कंत्राटी कर्मचाऱ्याकडून स्थानिक राजकीय नेत्यांचा छळ… जाणून घ्या काय आहे प्रकरण

पादचारी दिनातील उपक्रम

लहान मुलांसाठी रस्ता सुरक्षा कार्यशाळा
जुन्या पुण्याच्या विकासाबाबत पॅनल प्रदर्शन
अंध, अपंगांच्या सार्वत्रिक प्रवेशयोग्यतेसाठी कार्यशाळा
मानसिक आरोग्याबाबत पथनाट्य
पादचारी अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा
इतिहासप्रेमींसाठी शौर्य खेळ
संगीत आणि वाद्य कला सादरीकरण
हवेच्या गुणवत्तेची चाचणी

हेही वाचा : पुणे : गरवारे बालभवनच्या संचालिका शोभा भागवत यांचे निधन

वाहतुकीत बदल

लक्ष्मी रस्त्यावरील लिंबराज महाराज चौक ते गरुड गणपती मंडळ दरम्यानची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्त्याने टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी लिंबराज महाराज चौकातून (सेवासदन चौक) टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी सेवासदन चौकातून उजवीकडे वळावे. तेथून बाजीराव रस्त्यावरून इच्छितस्थळी जावे. कुमठेकर रस्त्याने लक्ष्मी रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी चितळे बंधू मिठाईवाले दुकानाजवळून डावीकडे वळून बाजीराव रस्त्याने इच्छितस्थळी जावे. रमणबाग चौकातून उंबऱ्या गणपती चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी लक्ष्मी रस्त्याकडे न जाता. केळकर रस्त्याने टिळक चौकाकडे जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.