पुणे : उन्हाळ्याची चाहूल लागल्याने सरबत विक्रेते तसेच रसवंतिगृह चालकांकडून लिंबांच्या मागणीत वाढ झाली असून, घाऊक आणि किरकोळ बाजारात लिंबांच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एका लिंबाची विक्री तीन ते पाच रुपयांना केली जात आहे.
उन्हाचा चटका वाढल्याने घरगुती ग्राहकांसह, रसवंतिगृहचालक सरबत विक्रेत्यांकडून लिंबांच्या मागणीत वाढ झाली आहे. गुलटेकडीतील बाजार आवारात मागणीच्या तुलनेत लिंबांची आवक कमी प्रमाणावर होत असून, गेल्या दहा दिवसांत घाऊक बाजारात लिंबांच्या दरात वाढ झाली आहे, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील लिंबू व्यापारी रोहन जाधव यांनी दिली.
किरकोळ बाजारात एका लिंबाची विक्री प्रतवारीनुसार तीन ते पाच रुपयांना केली जात आहे. मार्केट यार्डातील बाजारात सध्या दररोज आठशे ते हजार गोणी लिंबांची आवक होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी भागात लिंबांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. सोलापूर आणि अहिल्यानगर परिसरातून लिंबांची बाजारात आवक होत आहे. प्रतवारीनुसार लिंबांच्या गोणीला ४०० ते १००० रुपये असा दर मिळाला आहे. गेल्या आठवड्यात लिंबांच्या एका गोणीला ४०० ते ७०० रुपये दर मिळाले होते. एका गाेणीत आकारमानानुसार ३०० ते ३५० लिंबे असतात असे जाधव यांनी सांगितले.
उन्हाचा चटका वाढल्याने लिंबांच्या मागणीत वाढ झाली असून, सध्या किरकोळ बाजारात एका लिंबाला प्रतवारीनुसार तीन ते पाच रुपये असा दर मिळत आहे. येत्या काही दिवसांत लिंबांच्या मागणी आणि दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यात लिंबांना उच्चांकी दर मिळाले होते.
रोहन जाधव, लिंबू व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड