पुणे : ‘शहरातील अंधाऱ्या आणि निर्जन जागांची पाहणी करण्यात आली आहे. या भागात प्रखर पथदिवे बसविण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात येणार आहेत, तसेच या भागात गस्त वाढविण्याची आदेश शहरातील सर्व प्रमुख ठाण्यांच्या प्रमुखांना देण्यात आले आहेत,’ अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी दिली.
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारातील प्रवासी तरुणीवर बलात्कार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी मध्यरात्री शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून ताब्यात घेतले. ‘बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील अंधाऱ्या आणि निर्जन जागांची पाहणी पोलिसांकडून करण्यात आली. या भागात पथदिवे बसविण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत.पथदिवे बसविण्यासाठी पोलिसांकडून पाठपुरावा करण्यात येणार आहे. स्वारगेटसह शहरातील वेगवेगळ्या भागांची पाहणी करण्यात आली. ज्या भागात दिवे नाहीत. निर्जन रस्ते आहेत. अशा भागात पोलिसांना गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,’ असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘ बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील शहरातील टेकड्यांवर सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारकडून पुणे पोलिसांना ८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून, येत्या सहा महिन्यांत शहरातील २२ टेकड्यांवरील सुरक्षाविषयक कामे पूर्ण केली जाणार आहे. शहरातील २२ टेकड्यांवर ६०० अत्याधुुनिक कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यात २०० कॅमेरे फिरते (पीटीझेड) आहेत. गुन्हेगारांची ओळख पटविण्यासाठी टेकड्यांवर ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे असणार आहेत. टेकड्यांवर पॅनिक बटण यंत्रणा बसविण्यात येणार आहे. पॅनिक बटण दाबताच पोलीस नियंत्रण कक्षाला त्वरित सूचना मिळणार आहे. याशिवाय, टेकड्यांवर १७७ प्रखर प्रकाशझोत (फ्लड लाईट्स) बसविण्यात येणार आहे.’