पुणे : गणेशोत्सवाच्या काळात मध्यभागातील मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना पाठविला आहे. उत्सवाच्या काळात खडक, फरासखाना, विश्रामबाग पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात यावी, अशी सूचना मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या बैठकीत नुकतीच केली होती. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव पाठविला आहे.

वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाचा प्रारंभ शनिवारपासून (७ सप्टेंबर) होणार आहे. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी महिनाभरापासून पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली होती. पोलिसांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. उत्सव काळातील बंदोबस्ताची माहिती देण्यासाठी पोलीस आयुक्तालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : पोर्शे अपघात प्रकरणात सुनील टिंगरे यांचा संबंध? पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषदेत खळबळजनक माहिती

उत्सवाच्या कालावधीत मध्यभागातील मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याची सूचना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केली होती. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनंतर खडक, विश्रामबाग, फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मद्य विक्री दुकाने (वाइन शाॅप, परमिट रुम) दहा दिवस बंद ठेवण्यात यावीत, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. उत्सवाच्या काळात जिल्हा प्रशासनाने तीन दिवस मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याचे (ड्राय डे) आदेश दिले आहेत. प्रतिष्ठापना (७ सप्टेंबर), विसर्जन मिरवणूक (१७ सप्टेंबर) आणि मिरवणूक संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी (१८ सप्टेंबर) मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

उत्सवाच्या काळात साडेपाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे पुढील दहा दिवस अहोरात्र बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. भाविकांची सुरक्षा, गर्दीचे नियोजन, वाहतूक कोंडी सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गृहरक्षक दलाचे जवान, गुन्हे शाखेची पथके, केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या बंदोबस्तास राहणार आहेत. मानाच्या मंडळांसह गर्दीच्या ठिकाणी बाॅम्ब शोधक नाशक पथकाकडून (बीडीडीएस) नियमित तपासणी करण्यात येणार आहे. गर्दी, गैरप्रकारांवर शहरातील वेगवेगळ्या भागात लावलेले १३५६ सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवणार आहेत. मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : “ईट का जबाब पत्थर से..”, आंदेकर खून प्रकरणानंतर पोलीस आयुक्तांकडून गुंडांना इशारा

भाविकांसाठी ‘माय सेफ ॲप’

उत्सवातील घडामोंडीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी मंडळांची पाहणी (मॅपिंग) केली आहे. भाविकांसाठी माय सेफ ॲप तयार करण्यात आले आहेत. उत्सवाची माहिती, वाहने लावण्यासाठी जागा, पोलीस मदत केंद्र, पादचारी मार्ग, बंद रस्त्यांची माहिती या ॲपद्वारे दिली जाणार आहे. भाविकांसाठी मदत केंद्रे सुरू करण्यात येणार असून, मदत केंद्रांचे काम अहाेरात्र सुरू राहणार आहे.

चोरटे, सडक सख्याहरींचा बंदोबस्त

उत्सवात मध्यभागात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गर्दीत मोबाइल संच, रोकड, दागिने चोरीला जातात. पोलिसांनी चोरट्यांची यादी तयार केली आहे. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. उत्सवाच्या काळात परराज्यातील चोरट्यांच्या टोळ्या शहरात येतात. शहरातील लाॅज, हाॅटेलची पोलिसांकडून तपासणी सुरू करण्यात येणार आहे. गर्दीत महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे. छेड काढणाऱ्यांना पकडून त्यांचे छायाचित्र भरचौकात लावण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

हेही वाचा : पुणे: पूजा साहित्य, सजावट खरेदीसाठी शहराच्या मध्य भागात गर्दी, नदीपात्रातील रस्ता बंद असल्याने वाहतूक कोंडीमध्ये भर

दृष्टीक्षेपात बंदोबस्त

अतिरिक्त पोलीस आयुक्त – ४

पोलीस उपायुक्त – १०

सहायक आयुक्त – २३

पोलीस निरीक्षक -१२८

सहाय्यक निरीक्षक – ५६८

पोलीस कर्मचारी – ४ हजार ६०४

गृहरक्षक दलाचे जवान : ११००

राज्य राखीव पोलीस दल – १ तुकडी

केंद्रीय सुरक्षा दल, शीघ्र कृती दल – १० तुकड्या