पुणे : आरोग्य हा जनसामान्यांसाठीचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. नागरिकांना निरोगी ठेवण्यात सर्वांत कळीची भूमिका बजावते, ती सार्वजनिक आरोग्य व्यवस्था. आपल्या राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे सर्वंकष चित्र मांडणाऱ्या ‘जनस्वास्थ्य’ या ‘लोकसत्ता’च्या कॉफी टेबल बुकचे आज, शुक्रवारी (२० सप्टेंबर) पुण्यात राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रकाशन होत आहे. हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे. यानिमित्त ‘महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे वर्तमान आणि त्यापुढील आव्हाने’ या विषयावर चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा : ‘लाडकी बहीण’साठी सरकारने विविध विभागांचा निधी वळवला; कोणी केला आरोप?
‘जनस्वास्थ्य’मध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे सध्याचे चित्र, त्यात घडलेले सकारात्मक बदल आदी विविध विषयांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी लिहिलेले लेख आहेत. यानिमित्ताने राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा एक सर्वंकष दस्तऐवज तयार झाला आहे. प्रकाशन समारंभानिमित्त आयोजित चर्चासत्रात जनआरोग्य अभियानाचे सहसमन्वयक डॉ. अनंत फडके, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या क्रिटिकल केअर विभागाचे चीफ इंटेन्सिव्हिस्ट डॉ. प्रसाद राजहंस, प्रयास आरोग्य गट आणि जहांगीर व रुबी हॉल क्लिनिकशी संलग्न वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. स्मिता जोशी आणि राज्याच्या आरोग्य सेवा विभागाचे सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार सहभागी होणार आहेत.
●मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ
●सहप्रस्तुती : सिडको
●सहाय्य : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण ( म्हाडा ), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई आणि सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, महानिर्मिती