पुणे : मेट्रो स्थानकांच्या नावातून उत्पन्न मिळविण्याचा अनोखा मार्ग महामेट्रोने शोधला आहे. सध्या सहा मेट्रो स्थानकांच्या नावात कंपन्यासह इतर संस्थांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे महामेट्रोला या प्रत्येक स्थानकातून सुमारे ५५ ते ७२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. महामेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर अनेक कंपन्या आणि व्यावसायिक संस्था आहेत. त्यामुळे महामेट्रोने या संस्थांचा वापर मेट्रो स्थानकांच्या नावात जाहिरातीप्रमाणे करण्यास सुरुवात केली आहे. सध्या मेट्रो मार्गिका एकवरील फुगेवाडी आणि मेट्रो मार्गिका दोनवरील नळ स्टॉप, गरवारे महाविद्यालय, पुणे रेल्वे स्थानक, रूबी हॉल आणि कल्याणी नगर या स्थानकांच्या नावात कंपन्या आणि व्यावसायिक संस्थांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. स्थानकाच्या प्रवेशद्वारावर या कंपन्यांचे नाव दर्शनी भागात देण्यात आले आहे. या माध्यमातून महामेट्रो एका स्थानकातून वर्षाला ५५ ते ७२ लाख रुपये मिळवत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : छेडछाडीमुळे महाविद्यालयीन युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न, भारती विद्यापीठ परिसरातील घटना

जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या मार्गावरील मंडई, बुधवार पेठ या स्थानकांमध्येही नावांचा जाहिरातीप्रमाणे वापर करण्यात येणार आहे. याचबरोबर सध्या काम सुरू असलेल्या खडकी आणि येरवडा मेट्रो स्थानकातही आगामी काळात नावांचा जाहिरातीसाठी वापर केला जाणार आहे. बिगरप्रवासी उत्पन्नाचे विविध स्त्रोत महामेट्रोकडून शोधले जात आहेत. त्यातून बिगरप्रवासी उत्पन्नाचा वाटा एकूण उत्पन्नात वाढावा यासाठी पावले उचलली जात आहेत, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : पिंपरी: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तडीपार गुंडांचा शहरात वावर, चौघांना अटक; पिस्तूल, दोन कोयते जप्त

बिगरप्रवासी उत्पन्नावर भर

महामेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्याने प्रवाशांसाठी तिकिटांचे दर कमी ठेवावे लागतात. यामुळे प्रवासी वाहतुकीतून मिळणारे उत्पन्नही कमी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी बिगरप्रवासी उत्पन्नावर महामेट्रोकडून भर दिला जात आहे. यात स्थानकांमधील जाहिरातीसह मेट्रो गाड्यांवर जाहिराती केल्या जाणार आहेत. त्यातून बिगरप्रवासी उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune mahametro earning rupees 55 lakh to 72 lakh pa from names of the pune metro stations pune print news stj 05 css