पुणे : दौंड तालुक्यातील वरवंड येथील महानंदच्या दूध भुकटी प्रकल्पामुळे वायू आणि जलप्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने वरवंडमधील ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर गुरुवारी उपोषण केले. यानंतर मंडळाने प्रकल्पावर कारवाईचे पाऊल उचलले आहे.
वरवंडमधील महानंदचा प्रकल्प सध्या राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाकडून चालवला जात आहे. या प्रकल्पातील बॉयलरसाठी कोळशाचा वापर केला जातो. यामुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत आहे. प्रकल्पातून काळा धूर आणि धूळ बाहेर पडत आहे. यामुळे आजूबाजूची घरे आणि शेते काळी पडली आहेत. याचा गंभीर परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. खराब हवेमुळे नागरिकांना खोकला, श्वसनास त्रास आणि इतर श्वसनविकार उद्भवत आहेत. याचबरोबर प्रकल्पातून सांडपाणी प्रक्रिया न करता बाहेर सोडले जात आहे. त्यामुळे जलस्रोत प्रदूषित होत आहेत. याचबरोबर परिसरात दुर्गंधी पसरत आहे. कंपनीकडे तक्रार करूनही त्यांनी याबाबत उपाययोजना केलेल्या नाहीत.
या प्रकरणी नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मंडळाने यावर कारवाई न केल्याने वरवंडमधील ग्रामस्थांनी अखेर आंदोलनाचे पाऊल उचलले. त्यांनी मंडळाच्या कार्यालयासमोर गुरुवारी उपोषण केले. महानंदच्या प्रकल्पावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. याचबरोबर या प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला असून, नागरिक वारंवार आजारी पडत आहेत, अशी तक्रारही त्यांनी केली.
ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केल्यानंतर मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांनी त्यांच्याशी चर्चा केली. याबाबत कारवाईचे लेखी आश्वासही साळुंखे यांनी दिले. या प्रकरणी महानंदला मंडळाने २१ एप्रिललाच नोटीस बजावल्याचे सांगितले. महानंदने प्रकल्पाच्या ठिकाणी वायुप्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना न केल्याचा ठपका या नोटिशीत ठेवण्यात आला आहे. याचबरोबर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पही पूर्ण वेळ कार्यरत नसल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
महानंदच्या प्रकल्पाला प्रस्तावित कारवाईची नोटीस बजावली आहे. वायू आणि जलप्रदूषण केल्याप्रकरणी प्रकल्पावर कारवाई का करू नये, अशी विचारणा करण्यात आली आहे. प्रकल्पाने नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
जगन्नाथ साळुंखे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ