पुणे : महाराष्ट्रातही विमानतळाच्या धावपट्यांना विकसित करून विमानतळांचे जाळे निर्माण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे.तर पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे.लवकरच त्यासाठीचे भूसंपादन सुरू करण्यात येणार आहे. उद्योगांना नवी पुरवठा साखळी विकसित करता येईल आणि रोजगाराला चालना मिळेल असे विमानतळ आणि कार्गो सेंटर पुरंदर येथे उभारण्यात येईल.पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेता हे विमानतळ आवश्यक असून त्यामुळे पुण्याच्या जीडीपीमध्ये २ टक्के वाढ होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोहगाव येथील पुणे विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उदघाटन ऑनलाईनद्वारे करण्यात आले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार मेधा कुलकर्णी, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
हेही वाचा…‘सुप्रिया सुळेंशी का बोलत नाही?’ माध्यमांच्या प्रश्नांवर अजित पवारांनी दिलं भलतंच उत्तर, म्हणाले…
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की,पुणे शहर आणि जिल्हा महाराष्ट्राचे मॅन्युफॅक्चरिंग आणि आयटी हब आहे. देश विदेशातून अनेक नागरिक पुण्यात येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांना सुविधा देण्यासाठी जुने टर्मिनल अपूरे होते. संरक्षण मंत्रालयाला विनंती करण्यात येऊन नव्या इमारतीसाठी जागा उपलब्ध झाली आणि त्यामुळे भव्य टर्मिनल उभे राहिले आहे.महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा इमारतीच्या बाहेर उभारण्यात आला आहे. श्री विठ्ठलाचे म्युरल, वारली कला, देशी खेळ मल्लखांब आदींचे दर्शन या इमारतीत घडते.आपल्या स्थानिक संस्कृतीला साजेसे वातावरण इमारतीत आहे. विमानतळावर स्थानिक उत्पादनांची विक्री करता येणार आहे. एक परिपूर्ण टर्मिनल आपल्याला मिळाले आहे.कोल्हापूरलादेखील मराठा साम्राज्याला साजेसे असे टर्मिनल उभे राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविण्याचा प्रयत्न : अजित पवार
एकाचवेळी १० हजार कोटी रुपये खर्चाच्या १४ विमानतळ प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. बरेच दिवसापासून पुण्याच्या नावाला साजेसे टर्मिनल व्हावे ही पुणेकरांची मागणी होती. स्व.गिरीश बापट यांनीदेखील नव्या टर्मिनल इमारतीच्या जागेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला.एक हजार मोटारी उभे राहू शकतील, ३४ चेक इन काऊंटर,९० लाख वार्षिक प्रवासी क्षमता असलेले हे टर्मिनल आहे.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा परिसरात उभारण्यात आला आहे. एप्रिलमध्ये नव्या टर्मिनलच्या सुविधा सुरू करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यात नवे विमानतळ उभारण्यासोबत विद्यमान धावपट्टी वाढविण्याचा विचार करण्यात येत आहे. दूरदृष्टी असणारे प्रधानमंत्री असल्याने देशात असे आमुलाग्र बदल होत आहे असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणात व्यक्त केले.