पिंपरी : पुणे इंटरनॅशनल प्रदर्शन आणि कनव्हेन्शन सेंटर यांच्यावतीने १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित निर्यातक्षम संरक्षण सामग्री प्रदर्शन (महाराष्ट्र एमएसएमइ डिफेन्स एक्स्पो २०२४) पुढे ढकलण्यात आले आहे. आता २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन भरणार आहे. मोशी-प्राधिकरणातील मैदानावर १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. परंतु, काही कारणास्तव संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या मान्यतेने हे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. आता २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन भरणार आहे. या प्रदर्शनाला महाराष्ट्रातील लघु व मध्यम उद्योजक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या प्रदर्शनामध्ये ४६८ गाळे लावण्यात येणार आहेत. भारतातील सर्वात मोठ्या संरक्षण प्रदर्शनांपैकी एक हे प्रदर्शन मानले जाते. १२०० हून अधिक कंपन्या त्यांची उत्पादने प्रदर्शित करणार आहेत.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेसोबत भारतीय संरक्षण दल सहभागी होणार आहे. विविध विद्यापीठे आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांना संरक्षण क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या आणि उद्योग व्यावसायिकांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भारतीय सशस्त्र दलाचे दलप्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान हे प्रदर्शनाला उपस्थित राहणार आहेत.