पुणे : एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. हा सामना जिंकून भारतीय संघाला तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा जगज्जेता होण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात २० वर्षांनी आमनेसामने आले आहेत. यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया २००३ मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचले होते, त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर मात केली होती.
हेही वाचा : सात वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; रिक्षाचालक गजाआड
आता भारतीय संघाकडे या पराभवाचा बदला घेण्याची सुवर्ण संधी आली आहे. तर या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात क्रिडा प्रेमींमध्ये प्रचंड उत्साह पाहण्यास मिळत आहे. त्याच दरम्यान आज पुण्यातील कोथरूड भागातील मनसेचे नेते किशोर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विक्रमवीर विराट कोहली यांच्या पोस्टरला मनसैनिकांनी दुग्धाभिषेक करीत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.
तर यावेळी कोथरूड विभागाचे मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष शशांक अमराळे म्हणाले की, आपल्या परंपरेत चांगल्या कामाची सुरुवात मंदिरामध्ये जाऊन पूजा, प्रार्थना, दुग्धभिषेक करून केली जाते. त्या प्रमाणेच आज आपल्या सर्वांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आपण पोहोचलो असून ऑस्ट्रियालाचा निश्चितच पराभव करू, तसेच या देखील सामन्यात विराट कोहली शतक मारेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.