पुणे : पर्यावरण नियमांचा भंग करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मेडीलाइफ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि ऑक्सिकेअर हॉस्पिटल या दोन रुग्णालयांना मंडळाने नोटीस बजावली आहे. या दोन्ही रुग्णालयांवर कठोर कारवाई का करू नये, अशी विचारणा मंडळाने केली आहे. दरम्यान, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाने मंडळाच्या कारवाईला आक्षेप घेतला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पिंपरीतील काळेवाडी येथील मेडीलाइफ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि वाल्हेकरवाडीतील ऑक्सिकेअर हॉस्पिटलला ११ नोव्हेंबरला नोटीस बजावली. या रुग्णालयांकडून पर्यावरण नियमांचे पालन होत नसल्याची तक्रार मंडळाकडे करण्यात आली होती. मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तिची दखल घेत दोन्ही रुग्णालयांना भेट दिली. भेटीत रुग्णालयांकडून पर्यावरण नियमांचे पालन केले जात नसल्याची बाब उघडकीस आली. त्यामुळे त्यांना नोटीस बजाविण्यात आली.
हेही वाचा : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुटी? शिक्षण विभागाच्या सूचना काय?
मंडळाच्या परवानगीशिवाय रुग्णालये सुरू असल्याचे तपासणीत निदर्शनास आले. रुग्णालयांकडून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्पच कार्यान्वित नसल्याची बाब उघडकीस आली आहे. याचबरोबर नियमानुसार रुग्णालयांनी बँक हमी मंडळाने जमा केली नसल्याचेही समोर आले. या रुग्णालयांकडून पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई का करू नये, अशी विचारणा मंडळाने केली आहे. याप्रकरणी दोन्ही रुग्णालयांच्या अधिकाऱ्यांना २२ नोव्हेंबरला मंडळाच्या कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहून म्हणणे मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मंडळाकडून करण्यात आलेल्या या कारवाईला हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाने आक्षेप घेतला आहे. रुग्णालयांवर कारवाई करण्याआधी त्यांना नियमांबाबत योग्य माहिती द्यायला हवी, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला रुग्णालयांकडून सहकार्य केले जाते. मंडळानेही नियमांचे पालन करण्यासाठी रुग्णालयांना मदत करावी, असेही संघटनेने म्हटले आहे.
हेही वाचा : ‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
पर्यावरण नियमांची पूर्तता न करता रुग्णालये सुरू असल्याने त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यांना याप्रकरणी म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे. नियमांची पूर्तता न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
जगन्नाथ साळुंखे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने रुग्णालयांना नोटीस बजाविण्याआधी नियमांबाबत योग्य माहिती द्यायला हवी. नियम अतिशय किचकट असल्याने आणि त्यांचे प्रत्येक शहरात वेगवेगळे अर्थ लावले जात असल्याने त्यांत नियमितता नाही. यामुळे रुग्णालयांना सोबत घेऊन पर्यावरण नियमांची अंमलबजावणी करायला हवी.
डॉ. संजय पाटील, राष्ट्रीय सचिव, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया